Breaking News

प्रवासादरम्यान महिलांची छेड; प्रवाशांकडून धुलाई

सातारा, दि. 15 (प्रतिनिधी) : कोल्हापुर-सातारा प्रवासादरम्यान बसमध्ये बसलेल्या महिलांची छेड काढत त्यांचा विनयभंग करणार्‍या विष्णूनंद रामय्या यादव  (वय 45, रा. विसावा नाका, सातारा) याची प्रवाशांनी तसेच महिलांच्या नातेवाईकांनी धुलाई केली. धुलाईनंतर ताब्यात घेतलेल्या यादव याच्या विरोधात सातारा  शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली.
विष्णूनंद यादव हा रविवारी कोल्हापुरला गेला होता. तेथून परताना ज्योतीबा-पुणे गाडीने तो प्रवास करत होता. प्रवासादरम्यान यादव याने पुढच्या सीटवर  बसलेल्या महिलांना पाठीमागून चिमटे काढण्यास सुरुवात केली. आलटून-पालटून यादव महिलांना चिमटे काढत होता. प्रारंभी महिलांनी दुर्लक्ष केले, मात्र यादव  हा जाणीवपुर्वक चिमटे काढत असल्याचे लक्षात आल्यानंतर संतापलेल्या महिलांनी यादव याच्या कानाखाली दिली. हा प्रकार बसमधल्या इतरांच्या लक्षात  आल्यानंतर इतर प्रवाशांनीहीा यादवची धुलाई केली. त्यानंतर बस सातारा शहर पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आली. यानंतर पोलिसांनी महिलांची छेड  काढणार्‍या यादव याला ताब्यात घेतले. याबाबत 29 वर्षीय महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.