शहीद दीपक घाडगे यांचे पार्थिव आज येणार
पाक सैन्याने गुरूवारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सीमेवर बेछुट गोळीबार केला. हिंदुस्थानी लष्करानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत डोक्याला गोळी लागून जवान दीपक घाडगे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गुरूवारी सायंकाळपर्यंत त्यांच्या हौतात्म्याची बातमी फत्त्यापूरसह जिल्ह्यात वार्यासारखी पसरली.
खराब हवामानामुळे काल सीमेवरून जवान घाडगे यांचे पार्थिव आणणे शक्य झाले नाही. आज दुपारी दोनच्या सुमारास हेलिकॉप्टरने पुंछमधून जम्मुच्या दिशेने पार्थिव रवाना झाले. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता पार्थिव विमानाने पुण्याकडे रवाना होणार असून त्यानंतर दुपारी अडीचपर्यंत गावात पार्थिव येणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, दीपक घाडगे यांना वीरमरण आल्यामुळे फत्त्यापूरसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. दु:खाच्या छायेबरोबर देशभक्तीही ओथंबून वाहताना दिसत आहे. शहीद जवानाच्या सन्मानार्थ गावकर्यांनी उत्स्फूर्तपणे गावाची स्वच्छता केली आहे. गावाच्या पूर्वेला कामेरी रस्त्यालगतच्या शालुकर यांच्या शेतात अंत्यसंस्कारासाठी जमिनीची साफसफाई, लेवल, मंडप घालणे आदी कामे आज सुरू होती. लष्कराचे 2-3 अधिकारी कालपासून गावात असून त्यांच्या देखरेखीखाली ही तयारी सुरू आहे. आज तहसिलदार तसेच बोरगाव पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी गावात येऊन तयारीचा आढावा घेतला.
दरम्यान, शहीद घाडगे यांच्या घरात आपला सुपुत्र देशासाठी लढताना कामी आल्याचे वृत्त समजले असून जवळचे सर्व नातेवाईक घरी आले आहेत. गावकरीही घरी जावून घाडगे कुटुंबीयांना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.
घाडगे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी असा परिवार आहे. त्यांची बहीण पोलीसमध्ये असून सातार्यात कार्यरत आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीशी झगडत ही भावंडे मोठी झाली. आई-वडिलांनी रोजगार करून मुलांना शिकवले व मुलाला सैन्यात आणि मुलीला पोलीसमध्ये भरती केले. तेव्हापासून घराची परिस्थिती पालटली होती. अशावेळी जवान दीपकच्या शहीद होण्यामुळे सर्वांच्या जिवाला चटका लागला आहे.