माध्यमांना टीका करण्याचा अधिकार आहे...पण!
दि. 23, मार्च - योगी आदित्यनाथ यांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंञी म्हणून पदस्थापीत केल्यानंतर अनेकांच्या पोटात सुळ उठला आहे,वास्तविक सरकारचा मुखिया कोण हे ठरविण्याचा घटनात्मक अधिकार बहुमत मिळवून सरकार बनविणार्या पक्षाचा असतो.त्यावर भाष्य करण्याचा नसलेला अधिकार वापरून काही मंडळी नाहक आपली शक्ती नको तिथं वाया घालतात.सरकारच्या कारभारावर टीका टिपण्णी करण्याचा प्रत्येकाला आहे.पण त्यासाठी कारभार करण्याची संधी देण्याची कुणाचीच तयारी नसते.पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सरकार स्थापनेबाबतचे चिञ पाचही राज्यात स्पष्ट झाले.उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड मध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्याने भारतीय जनता पक्ष सरकार बनविणार हे स्पष्ट झाले होते.पंजाब मध्ये काँग्रेसनृ एक हाती सत्ता मिळवली.गोवा आणि मणिपुरमध्ये माञ कुठल्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने ञिशंकु परिस्थितीत सरकार कुणाचे यावर नाना तर्कांना जन्माला घातले गेले.कथित धर्म निरपेक्ष पुरोगाम्यांना प्रामाणिक साथ देऊन माध्यमांनीही भाजपाला लक्ष्य करीत मोदी द्वेषाचा धर्म पाळला.
इकडे उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा होण्यापुर्वीच माध्यमांमध्ये मुख्यमंञी कोण होणार हे जाहीर करण्याची स्पर्धा सुरू झाली होती.दोन दिवस केंद्रीय गृहमंञी राजनाथ सिंग हेच माध्यमांचे मुख्यमंञी ठरले होते.सबसे तेज खबर देण्याच्या व्यसनाची लत लागलेल्या माध्यमांनी नेहमीप्रमाणे कुठलीच शहनिशा न करता राजनाथ हेच मुख्यमंञी झाल्याचे जाहीर करून टाकले.जेंव्हा योगींच्या नावाची घोषणा झाली तेंव्हा ओढवलेली नामुष्की झाकण्यासाठी जुनी मढे उकरून योगींच्या आडून मोदींवर वार करण्याचा नतद्रष्टपणा सुरू झाला.
नरेंद्र मोदी विकासाच्या गप्पा मारून भगवी सत्ता थोपविण्याचे कारस्थान करीत असल्याचा प्रचार माध्यमांनी केला.
निश्चयी भुमिकेवर काम करणारे नरेंद्र मोदी यांनी बोंबा दुर्लक्षित करून योगींच्या हातात उत्तरप्रदेशची धुरा सोपवली.नेमका हाच निश्चयीपणा अनेकांना आजही डाचतो आहे.कर्तबगारीवर विश्वास नसलेली मंडळी नेहमी इतिहासात रममान राहून विद्यमान कर्तबगारीला सातत्याने नाकारत असतात,मोदींबाबतही या मंडळींनी हीच भुमिका स्वीकारल्याचे दिसते.योगी आदित्यनाथ यांचा पुर्व इतिहास काहीही असो,वर्तमान काळात ते एक जबाबदार कार्यप्रमुखाच्या भुमिकेत आहेत.चारशे आमदार आणि ऐंशी खासदार निवडून देणार्या, भारतीय राजकारणाची दिशा निश्चित करणार्या उत्तरप्रदेश सारख्या मोठ्या राज्याचा मुख्यमंञी म्हणून तितक्याच जबाबदारीने कारभार करावा लागेल याचे भान स्वतः योगी आणि त्यांच्यावर विश्वास ठेवलेल्या नरेंद्र मोदी यांना नक्कीच आहे.
त्याची झलक पहिल्या दोन निर्णयातच पहायला मिळाली,मुख्यमंञीपदाची सुञे स्वीकारल्यानंतर त्यांनी तात्काळ आपल्या मंञ्यांची संपत्ती घोषित करण्याचे फर्मान काढले.त्यानंतर राज्यातील सर्व जिल्हा दंडाधिकार्यांना आनलाईन आणले.व्हाट्स अप सारख्या समाजमाध्यमाचे व्यासपीठ जनता आणि प्रशासनातील सेतू म्हणून अंमलात आणण्याचे धोरण जाहीर केले.आणखी बरेच जनताभिमुख निर्णय नजिकच्या भविष्यात अपेक्षित आहेत.यानंतरही जनतेच्या दृष्टीने योगींचा कारभार निराशाजनक ठरला त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे.केवळ माध्यमांचा अजेंडा स्वीकारला नाही म्हणून टीका करण्याच्या हेतूने आरोप करण्याचा या मंडळींना कुणी दिला?