नेवासा पंचायत समितीच्या सभापतीपदी सुनिता गडाख तर उपसभापतीपदी राजनंदिनी मंडलिक
अहमदनगर, दि. 15 - अपेक्षेप्रमाणे नेवासा पंचायत समितीच्या सभापतीपदी सौ सुनिता शंकरराव गडाख यांची व उपसभापती पदी सौ राजनंदिनी अजित मंडलिक यांची बिन विरोध निवड झाली.
नेवासा पंचायत समितीच्या आज सभापती आणि उपसभापती निवडीच्या कार्यक्रमामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी वामनराव कदम तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे यांनी काम पहिले. क्रांतिकारी शेतकरी पक्षाने पहिल्याच धडाक्यात पंचायत समितीच्या 14 पैकी 12 जागेवर विजय मिळवून नेवासा पंचायत समितीवर एकतर्फी मताधिक्य मिळवले आहे. त्यामुळे निवड बिनविरोध होणार होतीच. माजी आमदार शंकरराव गडाखांच्या पत्नी सुनीताताई गडाख या सभापती होण्याची खात्री असल्याने स्वतंत्र क्रांतिकारी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पंचायत समितीच्या आवारात जमा झाले होते. तसेच पंचायत समितीच्या आवारात मोठा शामियाना उभारण्यात आला होता.
सभापतीपदासाठी सुनिता गडाख यांना सूचक म्हणून वैशाली एडके तर व उपसभापती पदासाठी राजनंदिनी मंडलिक यांना किशोर जोजार यांनी सूचक म्हणून प्रत्येकी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर फटाक्यांची मोठी आतिशबाजी करण्यात आली. भाजपचे एकमेव पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे हे गैरहजर राहिले.
हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सौ सुनिता गडाख यांचा सत्कार यांचा व राजनंदिनी मंडलिक यांचा सत्कार माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते झाला.
यावेळी बोलतांना सुनीताताई गडाख म्हणाल्या कि, ही जबाबदारी पार पाडतांना आपणास ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे आशीर्वाद मिळालेले आहेत तर ही जबाबदारी आपण प्रामाणिकपणे शेतकरी व गोरगरीब व महिलांसाठी मोठे काम उभे करून या पदाचे सोने करेन. आम्ही माणसे सांभाळणारी लोक आहोत.
