Breaking News

भारुडाच्या माध्यमातून एचआयव्ही-एडस विषयी जनजागृती अभियान

पुणे, दि. 18 - महाराष्ट्राची पुरातन पारंपारिक व सांप्रदायिक लोककला असलेल्या भारुडाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये एचआयव्ही -एडस विषयी जनजागृती अभियान राबविण्यात येत असून महाराष्ट्रातील पारंपारिक भारुड लोककलेतील सध्याच्या जेष्ठ कलावंत चंदाताई तिवारी यांच्या कन्या संध्या गोपाल साखी आपल्या कलापथकासह महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरीभागांमध्ये व्यापक जनजागृती अभियान राबवीत आहेत.विशेष म्हणजे चंदाताई तिवारी यांची नात गौरी गोपाल साखी यासुद्धा कलापथकामध्ये भारुड कलेचा वारसा चालवीत आहेत.त्यांनी पुणे येथे इटीरियर डिझायनरची  पदवी प्राप्त केली असून आपल्या आजीचा म्हणजेच चंदाताईतिवारींचा वारसा पुढे चालवणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्रशासनाच्या एडस नियंत्रण सोसायटीच्या माध्यमातून 14 मार्च ते 24 मार्च 2017 या कालावधीत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये विशेषतः शाळा -महाविद्यालये, बसस्थानके, बाजार पटांगण अथवा सार्वजनिक ठिकाणी पारंपारिक भारुड, गोंधळ, गवळण, प्रवचन, लावणी लघुनाट्य, संगीत नुत्य, स्वागतगीत मनोरंजन, आदी लोककलेतून एचआयव्ही-एडस विषयी जनजागृती अभियान राबविण्याकरिता व्यापक जनजागृती मोहीम आखण्यात आली  आहे.यामध्ये ग्रामीण भागातील लोककलावंतांचा सहभाग करण्यात येवून उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुळच्या पंढरपूर येथील सौ. संध्या साखी या आपल्या कन्येसह उपक्रमात सहभागी झाल्या असून दोन दिवसांपासून पुरंदर मध्ये जेजुरीतील बाजारतळ, बसस्थानक, तसेच सासवड येथिल सार्वजनिक ठिकाणांवर भारूडातून जनजागृती करीत आहेत त्यांचेसमवेत पाझर चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल केंगार, नीलम शिंदे, अनिल मेडशिंगकर, बजरंग साखरे, अजय राठोड (सिव्हील इंजिनियर )आदींचा संच आहे. शासनाकडून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये उपक्रम राबविताना प्रत्येक दिवसाला दोनच कार्यक्रम करण्याची परवानगी असते प्रत्येक कार्यक्रमाचे 4 हजार रुपये म्हणजेच फक्त आठ हजार रुपये संचाला मिळतात .कलाकाराला मानधन, वाहनखर्च, जेवण, राहण्याची व्यवस्था आदींचा खर्च पाहिला तर ही रक्कम फारच तोकडी आहे. संचाला दैनदिनखर्चाला मर्यादा ठेवाव्या लागतात. शासनाने कार्यक्रम असेल त्या ठिकाणी शासकीय विश्रामगृह उपलब्ध करून दिल्यास सहकार्य होईल तसेच मानधनातही वाढ करणे गरजेचे असले तरी शासनाकडून यां मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे मात्र महाराष्ट्राच्या भारुड लोककलेला संत एकनाथ महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांची परंपरा आहे. भारुड लोककलेचा वापर जनजागृतीसाठी आणि समाजप्रबोधनासाठी फार पुरातन काळापासून होत आहे तर आताच्या काळातही शासनाकडून हा उपक्रम राबविला जात असल्याने सांप्रदायिक लोककला जतन होत असल्याचे समाधान आहे. असे संध्या साखी यांनी बोलताना सांगितले पुढील आठवड्यात निगडी, पुणे शहर रेल्वेस्टेशन, स्वारगेट, येरवडा, शिक्रापूर, वाघोली येथे भारूडातून जनजागृती करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.