Breaking News

छावाने काढली लातुरात कर्जमाफीसाठी शासनाची प्रेतयात्रा

अंत्यसंस्काराचे साहित्य पोलिसांनी केले जप्त
लातूर, दि. 23 - विधानसभा निवडणुकीवेळी भाजपाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये शेतकर्‍यास संपूर्ण कर्जमाफी देतो असे घोषीत करूनदेखील या सरकारने कर्जमाफी दिली नाही त्याचा निषेध म्हणून अ.भा. छावा संघटनेच्यावतीने आज स्टेट बँक ऑफ हैद्राबादपासून शिवाजी चौकापर्यंत सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली.या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक प्रेतावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अंत्यसंस्काराचे साहित्य जप्त केले. 
2014 च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. या पक्षाचे सरकार राज्यात येवून 3 वर्षे झाले तरीही या सरकारने शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा केली नाही. नुकतेच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी अथवा शेतकर्‍यांना मदतीची घोषणा घोषीत करण्यात आली नाही. तसेच भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबद्दल आक्षेपार्ह विधान केले म्हणून या बँकेच्या औसा रोडवरील शाखेपासून छावा संघटनेच्यावतीने शिवाजी चौकापर्यंत सरकारच्या निषेधार्थ प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ताटीवर प्रेत ठेवून त्याला खांदा दिला, शिकाळे धरून उलटी हलगी वाजवीत ते शिवाजी चौकापर्यंत गेले. त्याठिकाणी आंदोलनकर्ते प्रतिकात्मक प्रेतावर अंत्यसंस्कार करण्याअगोदरच पोलिसांनी ते सर्व साहित्य जप्त केले. प्रतिकात्मक प्रेतयात्रेमध्ये छावाचे विजयकुमार घाडगे पाटील, भगवानदादा माकणे, अ‍ॅड. गणेश गोमचाळे, बाळासाहेब सपाटे, राजाभाऊ गुंजरगे, आकाश पाटील, बाळासाहेब जाधव, सोनेराव शिंदे, राहूल मुळे, मनोज फेसाटे, देवा निगुडगे, निलेश बाजुळगे, अमोल जाधव, किरण पाटील, अनिल चौधरी, सलीम शेख, विशाल पाटील,  संजू राठोड आदिंचा समावेश होता.