Breaking News

कोपरगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी अनुसया होन उपसभापतीपदी अनिल कदम

अहमदनगर, दि. 15 - कोपरगाव पंचायत समितीच्या सभापतिपदी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस वं काँग्रेस पक्षाच्या वतीने सौ. अनुसयाबाई रोहिदास होन व  उपसभापतीपदीसाठी अनिल बाळासाहेब कदम यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी तथा विशेष पुनर्वसन  अधिकारी श्रीमती ज्योती कावरे यांनी सभापतिपदी सौ. अनुसयाबाई रोहिदास होन व उपसभापतीपदी अनिल बाळासाहेब कदम यांची एकमताने निवड जाहीर  केली. तत्पूर्वी सभापतिपदाची सूचना श्रावण आसने यांनी मांडली तर उपसभापतिपदाची अर्जुनराव काळे यांनी मांडली. यावेळी नवनिर्वाचित सभापती व  उपसभापती यांचा युवा नेते आशुतोष काळे यानी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सभापती सौ. अनुसयाबाई रोहिदास होन व उपसभापतीपदी  अनिल बाळासाहेब कदम म्हणाले की, पक्षाने आमच्यावर टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवून युवा नेते आशुतोष काळे, राजेश परजणे व सौ. चैतालीताई काळे यांनी  दिलेल्या संधीबद्दल आभार मानून माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील ग्रामीण  भागाचा रखडलेला विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना युवा नेते आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव तालुक्याच्या जनतेने टाकलेल्या विश्‍वासाने आपली जबाबदारी वाढली आहे. नवनिर्वाचित  सदस्यांनी जनतेच्या विश्‍वासाला कुठेही तडा जावू न देता सत्तेचा उपयोग हा सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी करून जनतेच्या हिताला प्राधान्य दिले  पाहिजे. जनतेने इतिहास घडवतांना केलेले परिवर्तन कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारे आहे. तालुक्याच्या जनतेच्या राष्ट्रवादी  काँग्रेस व काँग्रेस पक्षाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. कोपरगाव तालुक्याचा जनतेने टाकलेल्या विश्‍वासाची परतफेड तालुक्यातील प्रत्येक गावात विकास कामे करून  करणार असल्याचे सांगितले. कोपरगाव तालुक्याच्या नव्या विकासपर्वाला आजपासून सुरुवात होत आहे. मिळालेली सत्ता जनतेच्या सेवेसाठी असून मिळालेल्या  संधीचे सोने करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत नेवून त्यांनी टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवा असा मौलिक संदेश  नवनिर्वाचित सभापती व उपसभापती तसेच पदाधिका-यांना दिला. यावेळी राजेश परजणे यांनी सर्वांना सोबत घेवून काम करणार असल्याचे सांगत वर्षानुवर्ष  दुर्लक्षित असलेल्या कुपोषित बालकांचा, पिण्याच्या पाण्याचा तसेच शिक्षणाच्या गुणवत्तेचा बोजवारा उडाला असून रस्त्यांच्या खूप समस्या असल्याचे सांगितले.  अखिल भारतीय काँग्रेसचे कोपरगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र जाधव आपल्या मनोगतात म्हणाले की, कोपरगावच्या जनतेला कोपरगाव तालुक्याचा उज्वल  भविष्यकाळ घडवायचा आहे त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेने तालुक्यात बदल घडवला आहे. यानिवडी प्रसंगी राजेंद्र जाधव, छबुराव आव्हाड, संभाजीराव काळे,  कारभारी आगवन, बाळासाहेब कदम, चंद्रशेखर कुलकर्णी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सचिन रोहमारे, सर्व संचालक  मंडळ, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, सुधाकर दंडवते, सौ. विमलताई आगवन, सौ. सोनाली साबळे, पंचायत समिती सदस्या सौ. पोर्णिमा जगधने, सौ.  वर्षा दाणे, सौ. योगिता पवार, अर्जुनराव काळे, मधुकर टेके, श्रावण आसने, कैलास राहणे तसेच रा. कॉ.प्रदेश सचिव संदिप वर्पे, कोपरगाव नगरपरिषदेचे रा.कॉ.  पक्षाचे सर्व नगरसेवक व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक माधवराव खिलारी यांनी केले, सूत्रसंचालन अरुण चंद्रे तर आभार चारुदत्त  सिनगर यांनी मानले.