एक परिपूर्ण हॉस्पिटल म्हणून आनंदऋषीजी हॉस्पिटलची राज्यभर प्रचिती
। समाजभुषण हस्तीमलजी मुनोत यांचे प्रतिपादन
अहमदनगर, दि. 17 - प्रबुद्ध विचारक आदर्शऋषीजी म.सा. यांच्या प्रेरणेतून कित्येक वर्षापासून रुग्णसेवेच्या माध्यमातून सुरु असलेल्या चांगल्या कार्यामुळे आनंदऋषीजी हॉस्पिटलची सर्व राज्यभर प्रचिती झाली आहे. या हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेचे कार्य चांगले असून, मानवतेचे ध्येय पूर्ण करण्यासाठी जैन सोशल फेडरेशन रात्रं-दिवस परिश्रम घेत आहे. सर्वसामान्यांना अतिशय अल्पदरात या रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवा मिळत असल्याने रुग्णांच्या चेहर्यावर हॉस्पिटलप्रती समाधान मिळतेे, असे प्रतिपादन जैन श्रावक संघाचे अध्यक्ष, समाजभुषण हस्तीमलजी मुनोत यांनी केले.राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या पुण्यस्मृतीदिनानिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे आयोजित मोफत बालरोग तपासणी शिबीराचे उद्घाटन समाजभुषण, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष व मर्चंट बँकेचे संस्थापक हस्तीमलजी मुनोत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ.आचलऋषीजी म.सा., पो.उपाधिक्षक बजरंग बनसोडे, पो.नि.सोमनाथ मालकर, शिबीराचे आयोजक चंदनमल केशरचंद मुनोत (नेवासकर) मेडिकल ट्रस्टचे लालचंद मुनोत, आनंदराम मुनोत, सौ.सुर्यकांता मुनोत, सौ.प्रेमलता मुनोत, मर्चंट बँकेचे अध्यक्ष संजीव गांधी, उपाध्यक्ष विजय कोथिंबीरे, संचालक सर्वश्री किशोर गांधी, मीनाताई मुनोत, मोहन बरमेचा, संजय बोरा, अमित मुथा, कमलेश भंडारी, आदेश चंगेडिया, सुभाष बायड तसेच कमलेश मुनोत, नरेश मुनोत, सचिन मुनोत, शितल मुनोत, श्रेया मुनोत व बालरोग तज्ञ डॉ.वैभवी वंजारी, डॉ.प्रकाश कांकरिया आदिंसह जिल्ह्यातून आलेले रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संतोष बोथरा यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करुन या हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. गेल्या 18 वर्षांपासून सातत्याने विविध आरोग्य मोफत शिबीरांच्या माध्यमातून रुग्णसेवेचे हे कार्य सुरु असल्याचे सांगून लवकरच हॉस्पिटलमध्ये एम.आय.आर.सेंटर व जागतिक दर्जाचे नेत्ररुग्णालय सुरु होणार असल्याचे सांगितले. तसेच मुनोत परिवार व मर्चंट बँकेचे हॉस्पिटलला नेहमीच सहकार्य लाभत असल्याचे सांगितले.
यावेळी पोलिस उपाधिक्षक बनसोडे म्हणाले, या हॉस्पिटलमध्ये विश्वसनिय व दर्जेदार रुग्णसेवा मिळते. व ही सेवा सातत्याने टिकून रहावी, यासाठी जैन सोशल फेडरेशन प्रयत्न करत असतात. आजच्या या शिबीराप्रसंगी बालके हे देशाची खरी संपत्ती आहे. त्यांचे आरोग्य सुजलाम् सुफलाम् रहावे, शिबीरासाठी सहकार्य करणारे मुनोत (नेवासकर) परिवाराचे त्यांनी विशेष आभार मानले.