Breaking News

अर्थसंकल्प सादरीकरणाच्या वेळी विधानसभेत विरोधकांचे ‘भजनी’ मंडळ

मुंबई, दि. 19 - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात केल्यावर आज विरोधी पक्षांनी भजनी मंडळाप्रमाणे  विधानसभेत गदारोळ केला. काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार फलक आणि टाळ घेऊन वेलमध्ये उतरले. विरोधकांनी मुनगंटीवारांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा पूर्ण  प्रयत्न केला. मात्र, मुनगंटीवारांनी आपले भाषण सुरूच ठेवले. अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनी फलक बाहेर नेण्याची सूचना केली मात्र विरोधकांनी फलक झळकावणे  चालूच ठेवले. दोन आमदार फलक घेऊन मुख्यमंत्र्यांसमोरून मुनगंटीवारांकडे जाऊ लागताच मुख्यमंत्र्यांनी इकडे यायचे नाही, तिथे जे करायचे ते करा, असे  सांगितले. मुख्यमंत्र्यांचा तो ‘अवतार’ पाहून मग ते आमदार पुन्हा मुख्यमंत्र्यांसमोर आले नाहीत. मात्र, मुनगंटीवार यांचे भाषण संपेपर्यंत विरोधकांनी गणपती  बाप्पाच्या आरत्या म्हटल्या. ते झाल्यावर शिवसेनेच्या माघारीला उद्देशून ’परत या, बाळासाहेब’ आणि ’पेंग्विन झाला, पेंग्विन झाला, शिवसेनेचा पेंग्विन झाला’  अशा घोषणाही दिल्या.