Breaking News

अर्थसंकल्पाचा अन्वयार्थ या विषयावर आज ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर यांचे व्याख्यान

पुणे, दि. 23 - महाराष्ट्र शासनाचा सन 2017-18 चा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. या अर्थसंकल्पातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी तसेच हा अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी आर्थिक साक्षरता आणि अर्थक्रांती प्रसारासाठी विशेष योगदान देणारे ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर यांच्या अर्थसंकल्पाचा अन्वयार्थ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन गुरुवार दि. 23 मार्च 2017 रोजी सायंकाळी 4 वाजता येथील नवीन मध्यवर्ती इमारतीमधील सहकार आयुक्तालय सभागृहात करण्यात आले आहे.
राज्य शासनाचा अर्थसंकल्प दि. 18 मार्च 2017 रोजी राज्य विधीमंडळाला सादर करण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडला.
या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पाची व्याप्ती आणि राज्यसरकारच्या विकासकामांची दूरदृष्टी सर्वसामान्य लोकांना समजावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयच्या विभागीय माहिती कार्यालय,पुणे आणि जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि. 23 मार्च रोजी येथील नवीन मध्यवर्ती कार्यालयाच्या सहकार आयुक्तालय सभागृहात सायंकाळी 4 वाजता या अर्थसंकल्पाचा अन्वयार्थ या विषयावर ज्येष्ठ संपादक, अर्थविषयक अभ्यासक यमाजी मालकर व्याख्यान देणार आहेत. श्री. मालकर यांनी आर्थिक साक्षरता आणि अर्थक्रांती प्रसारासाठी राज्यभर अनेक व्याख्याने दिली आहेत.
अर्थक्रांती चळवळीत ते सक्रीय आहेत. राज्याच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पाचे विविध पैलू ते या व्याख्यानाव्दारे उलगडून दाखविणार आहेत. तरी या व्याख्यानाला समाजातील सर्वस्तरातील लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उपसंचालक (माहिती) मोहन राठोड यांनी केले आहे.