Breaking News

भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका दुबईत?

मुंबई, दि. 29 - भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट मालिकेच्या चर्चांना पुन्हा एका उधाण आलं आहे. या वर्षअखेरीस भारत आणि पाकिस्तान संघात क्रिकेट मालिका खेळवली जाण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत बीसीसीआयला भारत सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. बीसीसीआयने या मुदद्यावर गृहमंत्रालयाला पत्र लिहून परवानगी  मागितली आहे. बीसीसीआयने पाकिस्तानविरुद्ध मोठ्या मालिकेचा प्रस्ताव ठेवला आहे. या मालिकेत 3 कसोटी, 5 वन डे आणि 2 ट्वेण्टी20 सामने खेळवले जातील असा  अंदाज आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही मालिका दुबईमध्ये खेळवण्यात येईल.
दोन्ही देशांचं सरकार आणि क्रिकेट बोर्डाची यावर सहमती झाल्यास, 2012 नंतर भारत-पाकिस्तानमध्ये होणारी ही पहिली मालिका असेल. 2012 मध्ये पाकिस्तानचा  संघ भारत दौर्‍यावर आला होता. या दौर्‍यात 3 वन डे आणि 2 ट्वेण्टी-20 सामने खेळले होते. भारताने वन डे मालिका 2-1 ने गमावली होती. तर टी-20 मालिका  अनिर्णित राहिली होती. परंतु चॅम्पियन्स ट्रॉफी आणि विश्‍वचषकात भारत-पाकिस्तानने एकमेकांचा सामना केला होता. आयसीसीच्या फ्यूचर टूर कार्यक्रमानुसार, 2014  मध्ये पाकिस्तान बोर्ड भारतासह एका मालिकेचं आयोजन करणार होतं. परंतु दोन्ही देशांमधील तणावामुळे संबंध बिघडले आणि मालिकाही रद्द झाली. तत्कालीन  बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर आणि पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांच्यातील बातचीतमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान, भारतीय संघाने  पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायचं की नाही याबाबत केंद्र सरकारसोबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं स्पष्टीकरण बीसीसीआयने दिलं आहे.