नवनागापुर येथील भाजी मार्केटच्या अध्यक्षांसह भाजी विक्रेत्यांचे उपोषण
। दखल न घेतल्यास आत्मदहनाचा इशारा
अहमदनगर, दि. 11 - भाजीमार्केटला दिलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाला विरोध करुन, मार्केटचे अध्यक्ष अंतोन गायकवाड यांच्या विरोधात खोटी तक्रार करणार्यांवर कारवाई करावी. तसेच दबावतंत्राने गायकवाड यांच्यावरील चालू असलेली तडीपार प्रस्तावाची कार्यवाही रद्द करण्याच्या मागणीसाठी गायकवाड यांच्यासह नवनागापुर भाजीपाला व्यापारी असोसिएशन संचलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केटच्या भाजी विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण केले. सदर मागणीची दखल न घेतल्यास गायकवाड यांनी आत्मदहणाचा इशारा दिला.नागापुर भाजीपाला व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अंतोन गायकवाड यांनी एमआयडीसी नवनागापुरच्या पश्चिम बाजूस शेतकरी व भाजीविक्रेत्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भाजी, मटण मार्केट चालू केले आहे. भाजीमार्केटला डॉ.बाबासाहेबांचे नांव दिल्याने काही सवर्ण व्यापारी अंतोन गायकवाड यांच्या विरोधात खोट्या तक्रारी करुन, त्यांच्यावर तडीपाराची कारवाई करण्यासाठी दबाव आनत आहे. भाजी मार्केटमध्ये स्वच्छता राहण्यासाठी एक महिला सफाई कामगार व भाजी मार्केट रस्त्यावर असल्यामुळे खरेदीसाठी येणार्या ग्राहकांची वाहने व्यवस्थित लावण्यासाठी दोन वॉचमन कर्मचारी नेमलेले आहे. त्यांचे वेतन अदा करण्यासाठी येथे व्यवसाय करणार्या शेतकरी व व्यापार्यांकडून 10 रु. ची पावती देवून रितसर पैसे घेतले जातात. तसेच जमा झालेल्या या पैश्यातून गो शाळा देखील चालवली जात आहे. मात्र काही समाजकंटक गायकवाड हे भाजी मार्केटमध्ये खंडणी वसुल करत असल्याचा खोटा आरोप करत आहे.
नवनागापुरचे ग्रामपंचायत सदस्य बंडू सप्रे यांनी बाजारमध्ये येवून बाजारातील पावत्या मी स्वत: गोळा करुन पैसे घेणार असल्याचे सांगून, गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आर्थिक हित साधून, जातीय विषमता पसरविणार्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. उपोषाणात हरिदास रणनवरे, ज्ञानेश्वर धसे, सागर जाधव, सुनंदा मुरुमकर, शांताबाई झरेकर, अंजू सकट, संतोष साळवे, आशा मदगे, मच्छिंद्र खळदकर आदि भाजी विक्रेते सहभागी झाले होते.