Breaking News

राजकीय बदलाचे वारे !

दि. 21, मार्च - भारतीय जनता पार्टी आपल्या विजयाने देशातील एकएक राज्य काबीज करत निघाले आहे. सुयोग्य नियोजन आणि तेवढयाच तत्परतेने निर्णयाची होणारी अंमलबजावणी या भाजपाच्या जमेच्या बाजू म्हणता येईल. मुख्यत: ज्या पक्षाला जसे नेतृत्व लाभेल तसे पक्षातील नेते काम करत असतात. नेतृत्व ते करून घेत असते. याउलट जर नेतृत्व सुस्तावले, ढेपाळले तर पक्षाची काय वाताहत होते, याचा अनुभव काँगे्रस पक्षाने घेतलाच आहे. काँगे्रस पक्षाला असा प्रभावी इतिहास आहे. मात्र योग्यवेळी योग्य नेतृत्वाचा विकास केला नाही तर पक्ष इतिहासजमा होतो, याचे विस्मरण काँगे्रसच्या नेतृत्वाला आला असावा. कारण काँगे्रसमध्ये एक नेतृत्वाची फळी उभी राहू नये, ज्यामुळे काँगे्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधीला त्याच पक्षातून शह मिळेल यासाठी मुद्दामहून नेतृत्वाचा उदय होऊ दिला नाही. परिणामी शक्ती असूनही त्याला रसद न पुरविल्यामुळे पक्षामध्ये नेतृत्वाची फळी निर्माण होऊ शकली नाही. तसेच काँगे्रस अध्यक्षा सोनिया गांधी या आजारी असल्यामुळे त्या पाचही राज्याच्या प्रचारात उतरू शकल्या नाही. तर दुसरीकडे प्रियंका गांधी यादेखील पुढे येऊन नेतृत्व हातात घेऊन, निर्णय घेण्याची क्षमता सिध्द करतांना दिसून येत नाही. त्यामुळे काँगे्रसपक्षांतीलच नेते आता सैरभेर झाले आहे. पक्षांकडून पुढील रणनिती ठरवण्यात येत नाही, कसलेही आदेश येत नाही. त्यामुळे पक्षसंघटना खिळखिळी झाली आहे. काँगे्रसकडे आता जनमाणसांतील मास लिडर राहिले नाहीत. एकेकाळी विलासराव देशमुख, आंध्रप्रदेशमध्ये वाय.एस. राजशेखर रेड्डी यासारखे विविध राज्यात जनमाणसांत प्रतिमा असलेल्या नेत्यांची फळी काँगे्रसकडे होती.मात्र आता ती फळी उध्दवस्त झाली आहे. तर काहीजण भाजपच्या तंबूत शिरून काँगे्रसच्या पराभवाचे जायंट किलर ठरले आहे. काँगे्रसची ही होणारी पडझड थांबविणारी कोणतीही सक्षम व्यक्ती आजमितीस काँगे्रसकडे उपलब्ध नाही. त्यामुळे पक्षसंघटन, शिस्तबध्द कार्यंक्रम राबवून नवीन नेतृत्व काँगे्रसला उभे करावे लागेल. खरे तर काँगे्रसने ही रणनिती 2014 च्या लोकसभेचे परिणाम समोर आल्यांनतर अवलंबायला हवी होती. मात्र काँगे्रसने पुढील कोणताही कालबध्द कार्यक्रम न राबवता सत्ताधार्‍यांच्या प्रत्येक रणनितीला नजरअंदाज करत राहिल्या. त्यामुळे एक एक राज्यातून काँगे्रसचा सफाया सहजरित्या होऊ लागला. पंजाबमध्ये कॅ. अमरिंदर सिंग सारखे जनमाणसांत आपली प्रतिमा निर्माण केलेले मास लिडर असल्यामुळे काँगे्रस तरली. तरीही काँगे्रसला त्याचे कसलेही सोयरसुतक असल्याचे दिसले नाही. काँगे्रसचे मुत्सदी आणि मुरब्बी नेत्यांना या पराभवाची मिंमासा करून काँगे्रस नेतृत्वाला त्याची जाणीव करून देण्याची तसदी भासली नसावी, कारण नेतृत्वाकडूनच या पराभवाला गांभीर्यांने घेण्यात आले नाही. एकेकाळी पराभवाचे चिंतन व्हायचे, चुकांचा स्वीकार करून, त्या पुन्हा होणार नाही याकडे जातीने लक्ष देण्यात येत असे. पंरतू आता काँगे्रसकडे थिंक टँकची उणीव पूर्णपणे दिसून आली आहे. ज्याचा फायदा आपसूकच भाजपला झाला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणूकांच्या निमित्ताने प्रथमच दिल्लीच्या राजकारणात मोदी आणि शहा या जोडागोळीने प्रवेश केला. मात्र या जोडगोळीने अंवलंबलेल्या रणनितीचा  भल्याभल्यांना अंदाज आला नाही. तसेच सतत जागरूक राहून फक्त सत्ता काबीज करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यामुळेच पंतप्रधान मोदी तीन दिवस वाराणसीमध्ये तळ ठोकून बसले होते. याउलट काँगे्रसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांना उत्तरप्रदेशमध्ये, अमेठीमध्ये तळ ठोकून बसण्यास कुणीही रोखले नव्हते. मात्र जिंकण्याची जी उर्मी, इच्छा भाजपकडे होती, ती काँगे्रसकडे अजिबात दिसली नाही. तसेच जनमाणसांच्या मनातील भावनांचा अंदाज आला पाहिजे, ती नाडी ओळखून,  पुढील राजकारणांची दिशा ओळखता आली पाहिजे. मात्र या सर्व गोष्टींचा काँगे्रसकडे अभाव होता. तर भाजपाकडून सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना हात घालण्यात आला. जसा की उत्तरप्रदेशात असलेल्या मुस्लिम समाजातील तलाकचा प्रश्‍न असेल, जातीच्या राजकारणाला दुरू सारत विकासाची केलेली बात असेल, याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले. यामुळे सहजच भाजपचे पारडे जड राहिले. त्यामुळे काँगे्रस, बसपा, सपा या पक्षांची पुरती नाचक्की झाली. मात्र आता पुढील येणार्‍या निवडणूकांकडे इतर पक्ष कशी रणनिती आखतात, त्यासाठी पुन्हा देशांत एकदा नवीन प्रयोग बघायला मिळतो का? या प्रश्‍नांचे उत्तर लवकरच मिळेल?