Breaking News

आर्थिक साक्षरतेविषयक शिबीरांचे आयोजन - व्ही. आर. सोनटक्के

अहमदनगर, दि. 17 - आर्थिक साक्षरता व कर्ज सल्ला केंद्र (एफएलसीसी) आणि बँकांच्यावतीने  डिसेंबर 2016 अखेर विविध ठिकाणी आर्थिक साक्षरतेविषयक एकूण 1589 शिबीरे घेण्यात आली. यामध्ये 1 लक्ष 41 हजार 788 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असल्याची माहिती केंद्राचे कौन्सलर व्ही.आर. सोनटक्के यांनी दिली. केंद्राची बैठक जिल्हा अग्रणी व्यवस्थापक राजेंद्र दायमा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प अधिकारी एस.आर. कुमखिले, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य जहागिरदार, संपदा ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक अनिरुध्द मिरीकर, आरसेटीचे संचालक एस.ए. पावसे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एस.एस.काटकर, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते. केंद्राच्या वतीने शेतकरी, स्वयंसहायता बचत गट, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, छोटे उद्योजक यांच्यासाठी आर्थिक साक्षरता व कर्ज सल्ला दिला जातो. कॅशलेस सुविधेबाबतही या केंद्राच्यावतीने प्रशिक्षण दिले जाते. केंद्राच्या वतीने 128 शिबीरे घेण्यात आली असून त्यामध्ये 8 हजार 390 प्रशिक्षणार्थी सहभागी झाल्याचेही  सोनटक्के यांनी सांगितले. ग्रामीण भागात सायंकाळी दिवाबत्ती सभांचे आयोजन करुन आर्थिक साक्षरतेबाबत माहिती देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.पात्र लाभार्थ्यांची कर्जप्रकरणे मंजूर करतांना बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन संपदा ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक अनिरुध्द मिरीकर यांनी केले. आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाल्याबद्दल राजेंद्र सरग यांचा जिल्हा अग्रणी व्यवस्थापक राजेंद्र दायमा यांच्याहस्ते या बैठकीत सत्कार करण्यात आला. आभार आरसेटीचे संचालक एस.ए. पावसे यांनी मानले.