Breaking News

गोव्यात मनोहर पर्रिकर यांनी विश्‍वासदर्शक ठराव जिंकला

पणजी, दि. 16 - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बहुमतासाठीची अग्निपरीक्षा पार पाडली आहे. गोवा विधानसभेत भाजपने 16 विरुद्ध 22 मतांनी विश्‍वासदर्शक ठराव जिंकला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, गोवा विधानसभेत आज मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना बहुमत सिद्ध करायचं होतं. सभागृहाचं कामकाज सकाळी 11.30 च्या सुमारास सुरु झाली.
40 जागांच्या गोवा विधानसभेत 13 जागा मिळवणार्‍या भाजपच्या समर्थनार्थ 22 आमदारांनी मतदान केलं. तर 17 आमदारांनी सरकारविरोधात मत केलं. तर मतदानापूर्वी काँग्रेस आमदार विश्‍वजीत राणे यांनी सभात्याग केला. अशाप्रकारे पर्रिकर यांनी विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक 21 आमदारांचा आकडा सहजरित्या पार केला.
गोव्याचे तेरावे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांचा मंगळवारी 14 मार्चला शपथविधी झाला. पर्रिकरांनी कोकणी भाषेत शपथ घेतली. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पर्रिकर यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. विधानसभा निवडणुकीत 40 पैकी काँग्रेसला सर्वाधिक 17, भाजपला 13, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला 3, गोवा फॉरवर्ड पार्टीला 3 जागा मिळाल्या होत्या. तर अपक्षांना 3 आणि राष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती. त्यातील मगोप, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि दोन अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपचं संख्याबळ 21 वर आलं.