Breaking News

रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 607 कोटी रूपयांच्या आराखड्याला मंजुरी

मुंबई, दि. 16 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या तीर्थक्षेत्र आराखडा समितीने आज रायगड किल्ल्याच्या विकासासाठी 607 कोटी रूपयांच्या  आराखड्याला मंजुरी दिली आहे. या विकास कामांसाठी विशेष अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात यावी, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
रायगड किल्ला जतन, संवर्धन आणि पर्यटन विकास आराखडा, म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद, सुलीभंजन पर्यटन विकास आराखडा, लोणार (बुलडाणा) पर्यटन  विकास आराखडा, माहूर देवस्थान (नांदेड) पर्यटन विकास आराखडा या राज्यातील चार पर्यटन विकास आराखड्यांना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या  बैठकीत मंजुरी देण्यात आली.
पर्यटन विकास आराखडा तयार करताना पर्यटकांसह स्थानिकांच्याही सोयी-सुविधांचा प्राधान्याने विचार करावा. तसेच विकास आराखड्याची अंमलबजावणी  करताना त्याच्या कामाचे नियोजन आणि दर्जा याकडे विशेष लक्ष द्यावे. रायगड किल्ल्यावरील कामांना प्राधान्य देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
रायगड किल्ला जतन, संवर्धन आणि पर्यटन विकास आराखडा 607 कोटी रुपयांचा असून पर्यटकांना/नागरिकांना किल्ल्यांचा इतिहास जिवंत करुन  दाखवण्यासाठी शिवसृष्टीसारख्या सुविधा निर्माण करण्यात येतील. रायगड किल्ल्यावर प्राचीन वास्तूंचे संवर्धन, शास्त्रयुक्त पध्दतीने डेब्रिज काढणे आणि  उत्खननातील प्राचीन इमारतीचे संवर्धन करणे, गडावर विविध ठिकाणी आधुनिक पध्दतीची स्वच्छतागृहे बांधणे, घनकचरा व्यवस्थापन, रायगड किल्ल्यावरील सर्व  वस्तूंचे डॉक्युमेन्टेशन, हद्दीचे सीमांकन आदी कामांचा समावेश या आराखड्यात करण्यात आला आहे.