Breaking News

उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच 60 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

लखनऊ, दि. 09 - विधानसभा निवडणुकीचं सातव्या टप्प्यातील मतदान पार पडताच उत्तर प्रदेशने मतदानाचा विक्रम नोंदवला आहे. उत्तर प्रदेशच्या इतिहासात  पहिल्यांदाच एकूण सात टप्प्यात 61.03 टक्के मतदान झालं आहे. देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशात सात टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडली. अखेरच्या आणि  सातव्या टप्प्यात 60 टक्के मतदान झालं. अजून एका जागेवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे हा आकडा आणखी वाढू शकतो. गेल्या निवडणुकीत उत्तर  प्रदेशात 59.40 टक्के मतदान झालं होतं.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक ही 2019 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल मानली जाते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी या  निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
उत्तर प्रदेशसह गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीचा निकालही 11 मार्चला लागणार आहे. मणिपूरमध्येही आज अखेरच्या टप्प्यातील  मतदान पार पडलं. उत्तराखंड, गोवा आणि पंजाबमध्ये यापूर्वीच मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी अकाली दल आणि भाजपच्या युतीसमोर  काँग्रेस आणि ‘आप’चं तगडं आव्हान असेल. तर गोव्यातही भाजपसमोर सत्ता वाचवण्याचं आव्हान आहे. उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये  थेट लढत होण्याची शक्यता आहे.