Breaking News

वाई तालुक्यातील 17 गावांत पाणी टंचाई

वाई, दि. 21 (प्रतिनिधी) : वाई तालुक्यात पाण्याचे स्त्रोत आटल्याने अनेक गावे पाणी टंचाईच्या विळख्यात अडकली आहेत. वाईच्या प्रांत कार्यालयाकडून 17 गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत. 
पूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदाराना टँकर मंजुरीचे अधिकार दिले होते. परंतू तहसीलदारांचे ते अधिकार काढून घेवून ते प्रस्ताव थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्याने टंचाई ग्रस्त गावांची फरपट होताना दिसत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रस्तावात काढण्यात येत असलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्त ग्रामपंचायतींना आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ आली आहे. यामुळे टंचाई ग्रस्त गावांमधून संतापाची लाट उसळली आहे. तरी तहसीलदारांना टँकर मंजुरीचे अधिकार दिल्यास टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणी मिळण्यासाठी मदत होईल.
टंचाई ग्रस्त गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक विहिरीपासून पाचशे मीटर परिसरात नवीन विहीर किंवा बोअरवेल काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वाई पंचायत समितीमधील पाणीपुरवठा विभागाने बोअरवेल घेणे, जुन्या पाणीपुरवठा योजनेची व हात पंपांची दुरुस्ती करणे, तात्पुरत्या स्वरूपाच्या नळपाणी पुरवठा योजना तयार करणे, तहसीलदारांच्या मार्फत गावातील विहिरी, बोअरवेल अधिग्रहण करून गावाचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील राहून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना प्रांताधिकार्‍यांनी दिल्या. बालेघर व धावडी या गावांचे पाणी टंचाईचे प्रस्ताव आठ दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहेत. परंतू त्याला मंजुरी न मिळाल्याने गावातील नागरिकांसह जनावरांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.