Breaking News

विकासाचे बुडबुडे आणि आजचे राजकारण !

दि. 27, फेब्रुवारी - लोकशाहीचा उत्सव म्हणजेच निवडणूका. मात्र आजकाल निवडणूकांचा कोष आणि परिभाषाच बदलत चालली आहे, असेच वातावरण एकंदरित देशातील निवडणूकांकडे बघतांना जाणवते. लोकशाहीचा हा उत्सव आता व्यावसायिकतेकडे वळू लागला आहे. त्यासाठी तत्व, निष्ठा, काम करण्याची तळमळ, आपला मतदारसंघातील कामाचा झपाटा, उरक, या बाबी आता गौण समजू लागल्या. आणि त्याची जागा आता, हायटेक प्रचार, सोशल मिडीयाचा वापर, वातावरणनिर्मिती, पैैश्यांचा वापर, या गोष्टी घेवू लागल्या आहे. संबधित उमेदवारांने आपल्या मतदारसंघात भलेही कोणतेही काम केले नसेल, तो कधीही कुणाच्या सुख दु:खात सहभागी झाला नसेल, तरी तो निवडून येऊ शकतो, ही परिभाषा अलीकडील काही निवडणूकांत टे्रंड घेत आहे.
हा निवडणूकांचा कोष, कधीपासून बदलला. याचा आढावा घेतल्यास याची पाळेमुळे भाजप या पक्षात दिसतील. मी भाजपाचा नाव घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावू शकतात. त्यासाठी जर आपण इंदिरा गांधीनी लादलेली आणीबाणी, त्यांनतर त्यांचा झालेला पराभव बघितला तर यासाठी विरोधकांनी कोणताही आकांडतांडव न करता, वैचारिक विरोध दर्शवत, एक विधायक कार्यक्रम हाती घेत इंदिरा गांधीच्या सत्तेला सुरूंग लावला होता. त्यांनतरच्या कालातही बर्‍याच वेळेस काँगे्रसला बहूमत मिळाले नाही. मात्र ज्या ज्यावेळेस काँगे्रसचा पराभव झाला आणि विरोधी पक्षांची सत्ता आली तोपर्यंत भारतीय राजकारण हे संसदीय चौकटीत, लोकशाहीचे भान राखत केलेले राजकारण होते. मात्र नंतरच्या काळात विरोधकांचे राजकारण बदलत गेले.दोन वेळा अल्पकाळ सत्ता मिळाल्यावर आणि 1999 मधील निवडणूकांत घवघवीत यश मिळाल्यानंतर 2004 च्या निवडणूकांमध्ये टिकून राहण्यासाठी, पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजपाकडून ‘इंडिया शायनिंग’ ची संकल्पना पुढे आणण्यात आली.‘इंडिया शायनिंग’ या संकल्पनेत भाजपातील प्रमोद महाजन, जसवंतसिंह यासह अनेक नेत्यांचा सहभाग होता.‘इंडिया शायनिंग’ विरोधीभासाचे स्वप्न रंगवण्यासाठी त्यावेळेस सरकारी खर्चाने सुमारे 500 कोटीपेक्षांही अधिक खर्च करण्यात आला.शेती, उद्योग, तंत्रज्ञानात भारताने नेत्रदीपक प्रगती केली आहे, भारत 2020 पर्यंत महासत्ता होणार, अश्या अनेक सुरस वल्गणा करण्यात आल्या होत्या.सत्ता मिळविण्यासाठी शायनिंग इंडियाचा गजर करण्यात आला. त्यावेळेपासून भारतीय राजकारणावर एक गडद छाया उमटली. तिचे प्रतिबिंब आज पाहायला मिळते. त्यावेळेस शायनिंग इंडियाचा गजर करतांना भाजपाच्या नेत्यांकडून भारताचे एक दिवास्वप्न रंगवण्यात आले. जे प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हते. त्या दिवास्वप्नामुळे सत्ताधार्‍यांवर टीकेची झोड उठवायची, प्रचारयंत्रणा हायटेक वापरत, विकासाचे दिवास्वप्न रंगवण्याचे कसब भाजपाच्या अंगलट आले. आणि त्यांची सत्ता बाजूला फेकली. मात्र त्यांनी त्यावेळेस पेरलेल्या यंत्रणेत बदल करत त्याला ‘ग्लोबल निती’चा रंग मोदी नरेंद्र मोदी 2014 साली लोकसभा निवडणूकांना सामोरे गेले. त्यांनी केलेले वादे, त्यांनी दाखविलेले विकासाचे स्वप्न प्रत्येक भारतीयांना प्रत्यक्षात अवतरल्याचा भास होत होता. कारण मोदीजी स्वप्नच इतके जबरदस्त रंगवत होते की, त्या स्वप्नाच्या विश्‍वात, कल्पनेच्या विश्‍वात सर्वसामान्यांना चांगलीच सैर घडवत होते. त्यामुळे सर्वांना एक विश्‍वास निर्माण झाला. भलेही तो विश्‍वास आंधळा असेल, ती कल्पना असेल, जी प्रत्यक्षात कधी अवतरेल की माहित नाही. मात्र त्या कल्पनेने आमच्या भारतीयांची मोदीजींवर एक श्रध्दा निर्माण झाली. आणि तीच श्रध्दा मतदानांमध्ये परिवर्तित होतांना दिसत आहे. नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या निवडणूका हे त्याचेच द्योतक आहे. असे असले तरी हे जाहीरातबाजीचे गारूड, विकासाचे दिवास्वप्न किती दिवस जनसामान्यांच्या मनावर मोहनी घालेल, याचा दावा आजमितीस तरी कुणी करू शकत नाही. कारण ही जनसामान्यांच्या मनावर घातलेली मोहनी उतरवण्यासाठी भारतीय लोकशाही प्रगल्भ व्हावी लागेल. या लोकशाहीतील मतदाराजाला आपल्या हक्कांची जाणीव, आणि ती वापरण्याची कुवत कळायला अजुनही वेळ आहे. त्यासाठी लोकशाहीला प्रगल्भ करण्यासाठी सरकारी पातळीवरच प्रयत्न व्होण्याची गरज आहे. विभूतीपुजा आणि व्यक्तीकेंद्रीत राजकारणामुळे कुठेतरी लोकशाही संकुचित होवु पाहत आहे. लोकशाही रसातळाला जाण्याचा धोका असतो, जेव्हा लोकशाहीचे पाईक सजग नसतील.