Breaking News

लोकशाहीचे वस्रहरण रोखण्यासाठी कृष्णाची प्रतिक्षा आहे का?

दि. 27, फेब्रुवारी - स्वातंञ्योत्तर भारताला महामानव डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली घटना समितीने राज्यघटना दिली.या देशाचा कारभार शंभर टक्के लोकशाही पध्दतीने व्हावा म्हणून 26 नोव्हेंबर 1949 रोजी ड्राप्टींग पुर्ण केलेली अंतिम सर्वमान्य राज्यघटना पुढील दोन महिन्यात म्हणजे 26 जानेवारी 1950 या दिवशी देशातील सामान्य मानसाला अर्पण केली.तो दिवस आपण तेव्हापासून प्रजासत्ताक दिन म्हणून  न विसरता उत्साहानं सोहळ्यात साजरा करतो.
या पविञ दिवसाचे महत्व आपल्यासाठी केवळ ध्वजारोहण,ध्वजवंदन करण्यापुरतेच.त्या क्षणानंतर हे राष्ट्र त्या महामानवांनी आपल्या सारख्या सामान्य भारतियांच्या हवाली केले आहे हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो.त्याचाच फायदा या देशावर राज्य करणार्या तमाम चांडाळ चौकडींनी घेतला आहे.या ठिकाणी त्या प्रवृत्तींना अजिबात दोष देता येणार नाही.खरे चांडाळ आपण आहोत.गुलामगीरीच्या साखळदंडातून आपल्याला मुक्त करण्यासाठी हजारो लाखोंनी आपल्या आयुष्याची होळी केली.त्यांचे हौतात्म्य आपण कृतघ्न पणे विसरलो आहोत.घटनाकारांनी या राष्ट्राला लोकशाहीचा बाज सजवून विश्‍वासाने आपल्याकडे सुपुर्द केले त्या विश्‍वासाला पाञ ठरलो नाही.आपल्या समोर लोकशाहीचे वस्रहरण होत असतांना आपण षंढासारखे उघड्या नजरेने कुण्या सुदर्शन चक्राची प्रतिक्षा करीत आहोत....
लोकशाहीच्या वस्रहरणाची ही परंपरा गेल्या वर्ष दोन वर्षात सुरू झाली असे मुळीच नाही.स्वातंञ्याचा जन्म होत असतानाच वस्रहरणाचे बीज जाणीवपुर्वक पेरले गेले.ज्यांनी ज्यांनी लोकशाहीला नंगे करून सत्तेचा मनमुराद उपभोग घेतला त्या प्रत्येकाने हे बीज पोसले.अगदी डा.बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विद्वत्तेलाही या मंडळींनी सोडले नाही.पुणे करारासारख्या अनेक मुद्यांवर सोशल ब्लक मेलींग करणार्या प्रवृत्तींचीच पिलावळ आपणही लोकशाहीच्या बुरख्याआड पोसत राहीलो.पक्ष कुठला, सत्ता कुठल्या पक्षाची हा मुद्दा गौण ठरलेला दिसतो.सारे एकाच प्रवृत्तीचे.सर्वांचा अजेंडाही एकच.लोकशाहीचे वस्रहरण करून सत्ता भोगणे,सामान्य माणसाला सत्ता प्रक्रियेच्या बाहेर फेकणे.
या परंपरेची विद्यमान हद्द अतिशय धोकादायक वळणावर आहे.कालपरवाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत जे घडलय ,ज्याची चर्चा सुरू आहे किंबहुना जो संशय व्यक्त केला जातोय तो अत्यंत धोकादायक आहे.महामानवाने आपल्या हाती दिलेले लोकशाहीचे शस्र बोथटच नव्हे तर  गंजवून निकामी करण्याची ही शास्रशुध्द खेळी आहे.लक्षात घ्या.ज्याच्या हाती ससा तो पारधी ही पारंपारीक म्हण सत्ताधारी निवडणूकीत अंमलात आणून  व्यवस्थेला नागवतात.व्यवस्थेच्याच हाताने या देशाचा खरा मालक असलेल्या सामान्य माणसाला सत्तेच्या प्रक्रीयेतून बाद करतात.त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मनपा निवडणूकीत विस्तारलेले प्रभाग.ज्याच्याकडे लाख अर्धालाख रूपये आहेत,तो सामान्य कार्यकर्ता निवडणूक लढवू शकणार नाही यासाठी ही सारी व्यवस्था केली गेली,सोबत यांञिक मतदान पध्दती.जी गोष्ट मनेज करता येते ,जिच्यावर संशय व्यक्त होऊ शकतो अशा यंञावर पुढारलेले देशही विश्‍वास ठेवत नाही,तिथे भारतात लोकशाहीच्या मुळावर उठू पाहणार्या यांञिक मतदानाचा आग्रह का धरला जातो.यासारख्या बर्याच गोष्टी आहेत,या विरूध्द आवाज उठवून आपले षंढत्व विसरून जनतेलाच संघर्ष छेडावा लागणार आहे,लोकशाहीचे वस्रहरण रोखण्यासाठी कुण्या कृष्णाने जन्म घ्यावा ही प्रतिक्षा असेल तर लोकशाहीचा बुरखा घालून हेच दुर्योधन घात करतील. (क्रमशः)