Breaking News

सैदापूर येथील एकास सक्तमजुरी

सरपंचास जातीवाचक शिवीगाळ 

सातारा, दि. 26 (प्रतिनिधी) : सातारा तालुक्यातील सैदापूर येथील महिला सरपंचास जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपी प्रवीण अंकुश पवार (रा. सैदापूर) याला जिल्हा सत्र न्यायाधीश एन. के. चव्हाण यांनी सहा महिने सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सैदापूर (ता. सातारा) येथे सविता अंकुश लोंढे या कुटुंबियांसमवेत राहण्यास आहेत. लोंढे ह्या 2015 मध्ये सैदापूरच्या सरपंच म्हणून कार्यरत होत्या. याच ग्रामपंचायतीत विरोधी गटाचे उमेदवार प्रविण अंकुश पवार हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत होते. पवार ज्या प्रभागातून सदस्य म्हणून कार्यरत होते, त्या भागातील राणा प्रतापनगरमधील गटारे तुंबली होती. दि. 23 नोव्हेंबर 2015 रोजी दुपारी 12 च्या सुमारास लोंढे ह्या ग्रामपंचायतीत काम करत होत्या. याच दरम्यान ग्रामपंचायतीमध्ये प्रविण पवार आले. पवार यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंच सविता लोंढे यांना राणा प्रतापनगरमधील गटारे तुंबली आहेत, तुम्ही सरपंच आहात, तुमचे काम तुम्ही करा, नवर्‍याला करुन देवू नका, असे म्हणत गटारे साफ करण्याच्या कारणावरुन वाद सुरु केला.
यावरून जोरदार खडाजंगी झाल्यानंतर लोंढे ह्या ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर आल्या. यानंतर त्यांच्या पाठीमागे येवून पवार याने पुन्हा वाद उकरून काढत जातीवाचक शिवीगाळ केली. याबाबतची तक्रार लोंढे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांनी करत दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायाधीश एन. के. चव्हाण यांच्या न्यायालयात सादर केले. साक्षीदारांनी नोंदविलेल्या साक्षी ग्राह्य मानत न्यायालयाने प्रविण पवार याला 6 महिने सक्तमजुरी, 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडापैकी 9 हजार रुपये फिर्यादीस तर 1 हजार रुपये सरकारजमा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. मिलिंद ओक यांनी काम पाहिले. त्यांना प्रॉसिक्यूशनचे उपनिरीक्षक अविनाश पवार, नंदा झांजुर्णे, कांचन बेंद्रे, अजित शिंदे, शमशुद्दीन शेख, सुनील सावंत, जयश्री माळी, अविनाश पवार, संदीप साबळे, उज्वला कुंभार, वासंती वझे यांनी मदत केली.