Breaking News

यंदाच्या पावसावर एल निन्योचं सावट

मुंबई, दि. 01 - यंदाच्या मान्सूनवर एल निन्योच्या सावटाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील शेतकर्‍यांची धाकधूक वाढली आहे. ऑस्ट्रेलियन वेधशाळेने एल निन्योच्या प्रभावाबाबतचा यंदाचा पहिला अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार आगामी काळात एल निन्योची शक्यता 50 टक्क्यापर्यंत वाढवली आहे. आत्तापर्यंत एल निन्यो न्यूट्रल राहिल अशी आशा ऑस्ट्रेलियन वेधशाळेला वाटत होती. मात्र ताज्या बदलांची दखल घेत त्यांनी एल निन्योच्या प्रभावाला तोंड देण्यासाठी तयारी सुरु केली आहे. अपवाद वगळता भारतासाठी तरी एल निन्यो म्हणजे दुष्काळ हे समीकरण मानलं जातं.
असं असलं तरी फेब्रुवारी ते मे या काळातील एल निनोचा अंदाज तंतोतत खरा उतरतोच असं नाही. त्यामुळे भारतीय हवामान खात्याच्या पुढच्या महिन्यात होणार्‍या पहिल्या घोषणेकडे आपलं लक्ष असेल. एल निन्योमुळे जगाच्या बहुतांश भागात/ भारतात कमी पाऊस/दुष्काळ/अवर्षणाची स्थिती होते. तर ला निन्योमुळे भारतात सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्यास मदत होते. ऑस्ट्रेलियासारख्या काही देशात महापुराच्या घटनाही घडतात. एल निन्योचा प्रभाव कमी होऊन तो न्यूट्रल राहिला तरी आपल्याकडे सरासरी पाऊसमान होण्याच्या आशा वाढतात.
2016 हे वर्ष आत्तापर्यंतच्या सर्वात उष्ण वर्षांपैकी एक मानलं जातं. त्याचा सर्वाधिक फटका ऑस्ट्रेलियाला बसला आहे. मात्र भारतात आणि त्यातही महाराष्ट्रासाठी 2016 हे आधीच्या तुलनेत चांगल्या/सरासरी पावसाचं वर्ष राहिलं. सध्या राज्यात शिवसेना- भाजपमधील कुरबुरींमुळे मध्यावधीचं वातावरण तापू लागलं आहे, पाऊस चांगला झाला तर त्याचा फायदा सत्ताधार्‍यांना होतो, असा आत्तापर्यंतचा ठोकताळा आहे. त्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा पावसाळा/मान्सून हा फक्त शेतकरी, व्यापारी वर्गासाठीच नव्हे तर सत्ताधार्‍यांसाठीही अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.