Breaking News

काय पहावे आणि काय पाहू नाही हे आपण लोकांना का सांगावे? - श्याम बेनेगल यांचा सवाल

मुंबई, दि. 25 - लोकांना मतदानाचा अधिकार आहे. त्यांना सरकार बदलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी काय पहावे आणि काय पाहू नाही हे आपण त्यांना का सांगावे?, असा सवाल ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी केला आहे. ’लिपस्टीक अंडर माय बुरखा’ या निर्माता प्रकाश झा यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनास सेन्सॉर मंडळाकडून परवानगी नाकारण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. चित्रपटाचा कोणताही भाग कापण्याच्या मी विरोधात नाही. मात्र, आम्हाला चित्रपटांचे वर्गीकरण हवे आहे. सेन्सॉरशीप नको, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
याशिवाय अभिनेता विवेक ओबेरॉय व दिग्दर्शक कबीर खान यांनीही याप्रकरणी आपली मते व्यक्त केली आहे. सेंन्सॉरशिप दिग्दर्शकासारखी असायला हवी,त्यासाठी कात्री हातात हवीच असे नाही, असे विवेक ओबेरॉयने म्हटले आहे. तर कुठला चित्रपट समाजासाठी चांगला आणि कुठला नाही हे दोन-तीन जण कसे ठरवू शकतात असा सवाल कबीर खान यांनी उपस्थित केला आहे.
या चित्रपटातील काही दृश्ये अतिशय संवेदनशील असून ती अश्‍लिलतेकडे झुकणारी आहेत. त्यामुळे समाजातील काही घटकांचा विचार करता या चित्रपटाच्या प्रदर्शनास परवानगी नाकारत असल्याचे सेन्सॉर मंडळाकडून सांगण्यात आले.