Breaking News

डिंपल यादव यांचं पुणे कनेक्शन!

मुंबई, दि. 27 - गेल्या महिनाभरापासून उत्तर प्रदेशातील राजकारणाचं केंद्रबिंदू ठरणार्‍या डिम्पल यादव यांचं महाराष्ट्र कनेक्शन आता समोर आलं आहे. अखिलेश आणि डिम्पल यादव सोनिया आणि राजीव गांधी यांच्यानंतर कदाचित राजकारणातली ही सर्वात ग्लॅमरस जोडी असेल. पण बर्‍याच लोकांना माहित नसेल. सध्या उत्तर प्रदेशच्या कानाकोपर्‍यात सभांचा धडाका लावणार्‍या डिंपल यांचा जन्म आपल्या पुण्यात झाला आहे.
15 जानेवारी 1978 रोजी पुण्यात डिंपल यांचा जन्म झाला. वडील सी. एस. रावत हे भारतीय लष्करात कर्नल होते. त्यामुळे डिंपल या फार काळ पुण्यात राहिल्या नाहीत. कधी भटिंडा, कधी अंदमान, कधी लखनौ अशा बदल्या होत असल्यामुळे डिंपल यांनाही देशभ्रमंती करावी लागली. पण 1995 मध्ये लखनौमध्येच असताना एका कॉमन फ्रेन्डमुळे डिंपल आणि अखिलेशची ओळख झाली आणि अखिलेश पहिल्या नजरेतच 17 वर्षीय डिंपलच्या प्रेमात पडले.
पुढची 4 वर्षे दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. पण उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्यानं अखिलेशला त्यांचं हे नातं समाजापासून लपवून ठेवावं लागलं. कालांतराने अखिलेश शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेले. पण तिथूनही पत्राद्वारे या दोघांची प्रेमकहाणी सुरु होती. शिक्षण संपल्यानंतर पुन्हा घरी परतलेल्या अखिलेशची प्रेमकहाणी वडील मुलायम सिंह यांना कळली. सुरुवातीला प्रचंड विरोध झाला. पण अखिलेशची आजी मूर्तीदेवी यांनी मध्यस्थी केली आणि अखेर 1999मध्ये अवघ्या 21व्या वर्षी डिंपल रावत ही डिंपल यादव झाली.
सुरुवातीला काही काळ राजकारणी घरात रमणं डिंपल यांना कठीण गेलं. पण हळू हळू त्याही सरावल्या. राजकारणाची कोणतीही पार्श्‍वभूमी नसताना डिंपल यांना अखिलेशनं राजकीय आखाड्यात उतरवलं. पण पहिल्याच प्रयत्नाच डिंपल यादव अपयशी ठरल्या.