Breaking News

तुर खरेदी केंद्र 15 मार्च, नंतरही सुरु राहणार

शेतकर्‍यांनी एकाच वेळी खरेदी केंद्रावर गर्दी करु नये

मुंबई, दि. 27 -  केंद्र शासनाने तुर खरेदी करीता 90 दिवसांचा कालावधी निश्‍चित केला आहे. राज्यात तुर खरेदीचा हा कालावधी दिनांक 15 मार्च, 2017 पर्यंत आहे. त्यानंतरही केंद्र शासनाला खरेदी केंद्र सुरु ठेवण्याबाबत विनंती करण्यात येत असून ही खरेदी केंद्र 15 मार्च नंतरही सुरु राहणार आहेत. तरी शेतकर्‍यांनी एकाच वेळी गर्दी करु नये असे पणन विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
तुर खरेदीच्या संदर्भात पणन मंत्री सुभाष देशमुख, यांच्या दालनात दिनांक 22 फेब्रुवारी,2017 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नाफेड, भारतीय अन्न महामंडळ व वखार महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यामध्ये या वर्षी चांगला पाऊस झाल्याने तुरीचे अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन झाले आहे त्यामुळे तुर खरेदीत वाढ होत आहे.  तुर खरेदीकरीता आवश्यक असणारा बारदाना तसेच साठवणुकीसाठी आवश्यक असणारी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली.
ज्या जिल्ह्यामध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी वखार महामंडळाने पणन महासंघ, कॉटन फेडरेशन, जिल्हा पुरवठा अधिकारी, आदिवासी विकास महामंडळ, बाजार समिती, सहकारी संस्था, यांची गोदामे प्राधान्याने तुर साठवणूकीसाठी भाड्याने घ्यावीत. तसेच विशेष बाब म्हणून खाजगी गोदामे भाड्याने घेण्याबाबतचे निर्देश वखार महामंडळास देण्यात आले.
वखार मंडळाने त्यांची उपलब्ध असणार्‍या गोदामाची माहिती दिली व सदरील गोदामाची मालाची साठवणूक करण्याकरीता नाफेडने 50 किलो मीटर पेक्षा जास्त अंतर वाहतूक करण्यास मान्यता द्यावी असे सांगितले, त्यानुसार केंद्र शासनाकडे राज्य शासनाकडून जास्तीची वाहतूक करण्यास मान्यता मिळण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. केंद्र शासनास नाफेडने खरेदी केंद्रावर अतिरिक्त मनुष्यबळ व बारदाना उपलब्ध करण्याबाबत कळविण्यात आले आहे. सध्या नाफेड इतर राज्यातून बारदाना उपलब्ध करुन देत आहे.
केंद्र शासनाच्या भाव स्थिरता योजनेंतर्गत आधारभूत दराने राज्यात दिनांक 15 डिसेंबर, 2016 पासून तुरीची खरेदी करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या पणन विभागाअंतर्गत पणन महासंघ, नाफेड व भारतीय अन्न महामंडळ यांच्यावतीने तुरीची खरेदी करीत आहे. या व्यतिरिक्त राज्यामध्ये नाफेड व भारतीय अन्न महामंडळाकडून व्हीसीएमएस कडून खरेदी करीत आहे. तसेच एसएफसी स्वतंत्रपणे शेतकरी मंडळामार्फत केंद्र शासनाच्या संरक्षित साठ्यामध्ये तुर खरेदी करीत आहे. पणन महासंघ, नाफेड, भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने 125 खरेदी केंद्रावर अनुक्रमे, 8,96,723 व 96,115 अशी एकूण 9,92,839 क्विंटल तुरीची खरेदी आजपर्यंत करण्यात आली असून त्यापोटी रु. 354.99 कोटीचे 54688 शेतकर्‍यांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. असेही विभागाने सांगितले आहे.