Breaking News

गिधाडांची तोंड कबुतरासारखी झाली म्हणजेच निवडणूक जवळ आली...

नाशिक, दि. 18 - प्रत्येक हंगामाचे एक ठळक वैशिष्ट्य असते. निसर्गाची ती किमया म्हटली जाते, श्रावण असो नाही तर भाद्रपद...वनस्पती सुध्दा परागसिंचनाची क्रिया विशिष्ट हंगामातच पार पाडतात.माणुस तर हंगामाच्या पुरता आहारी गेलेला आहे.हंगामानुसार बदल करण्याची ताकद माणसात उपजतच आहे.म्हणून तर जिथं स्वार्थ तिथं लवकीच व्हायचं असतं हे माणसाला चांगलं कळत.मुळ स्वभाव झाकून ठेवणं आणि वेळ मारून (मन मारून देखील) नेणे हे लक्षण मानव असल्याचे उदाहरण....
सध्या महाराष्ट्रात निवडणुकांची लगीन घाई सुरू आहे.पुर्णवेळ राजकारण हा ज्यांचा व्यवसाय(खरे तर पिंड म्हणायचे आहे पण विद्यमान परिस्थिती परवानगी देत नाही) आहे त्यांच्यासह छंदीफंदीही या लगीनघाईत आपले हेतू साध्य करणाच्या भानगडी उरकू पहात आहेत.आता या भानगडींना यशाच्या बोहल्यावर चढवायचे म्हणजे मायबाप मतदार राजाला विसरून कसे चालेल, म्हणून झाडून सार्‍या इच्छुकांना जनता जनार्दनाची आठवण होउ लागली आहे. वाढदिवस सण, उत्सव, शोकग्रस्तांसाठी शोकसंदेश या सर्व प्रकारच्या संदेशांचे उदंड पिक उभरू लागले आहे. उद्देश एकच जनता जनार्दनाची या मंडळींना भलतीच काळजी...अन त्या आस्थे पोटीच हे प्रेम उतू येऊ पहातयं....
निवडणुका नसतात तेव्हा हिच मंडळी कुठे असते हा सवाल रास्त असला तरी विचारण्याचे औचित्य नाही कारण आता खरा त्यांचा हंगाम सुरू झाला आहे. आणि या हंगामात स्वतःला अ‍ॅडजस्ट करण्याची कला त्यांना आणि फक्त त्यांनाच अवगत आहे. एरवी आज त्यांच्या दृष्टीने मायबाप असलेल्या जनता जनार्दनाच्या विकासाच्या योजनांवर गिधाडासारखी टोचे मारणारी ही जमात कबुतराची भाषा बोलू लागली तेव्हाच या भुमीवर मतदाराच्या राज्याभिषेकाची तयारी त्यांनी सुरू केल्याची चाहूल लागली होती, पाच वर्ष याच राजाचे दररोज श्राध्द घालणार्‍या गिधाडांच्या टोळ्या आज कबुतराच्या कातड्याची शाल पांघरून मायबाप जनतेला पैगाम धाडू लागले आहेत. पुर्वी जेंव्हा आजच्या सारखी दळणवळणाची साधने प्रगल्भ नव्हती तेव्हा संदेश वहनाचे काम कबुतर करायची.दळणवळणाचे वाहक म्हणून कबुतराला राजमान्यता होती.तेंव्हा आणि नंतरही शांतता आणि प्रेमाचा दूत म्हणून कबूतर सर्वमान्य होते आजही आहे.तेच कबुतर आज गिधाडांच्या टोळीने हायजक केले की काय अशी शंका येण्याइतपत वातावरण बदलतांना दिसत आहे.
मायबाप मतदार राजाची भुमिका संपली की हेच कबुतराची शाल फेकून ते आपल्या मुळ गिधाडांच्या धर्मात वावरू लागतात.पुढील पाच वर्षात मायबाप जनता त्यांच्या दृष्टीने मृत असते आणि मग मृताच्या टाळूवर टोचे मारून लोणी खाण्यास त्यांना कुठलीच लाज  वाटत नाही.अर्थात हे वर्णन सर्वानाच सारखे लागु पडते असा आमचा दावा नाही गिधाडांच्या या राज्यातही काही चांगल्या प्रवृत्ती आपले काम करीत आहेत,अशी राजकीय सामाजिक सन्माननीय मंडळी याच खर्‍या जनताजनार्दनाच्या मतांचे हक्कदार आहेत.या मंडळींना हे वर्णन लागू पडत नाही,त्यांनी ते मनाला लावून घेत उगीचच आकांडताडव करू नये किंबहूना आपला आत्मविश्‍वास डळमळण्यास गिधाडांना निमित्त देऊ नये.तुर्तास इतकेच...