Breaking News

भारताने कटक वन डेसह मालिकाही जिंकली!

भुवनेश्‍वर, दि. 20 - विराट कोहलीच्या टीम इंडियाने कटकच्या दुसर्‍या वन डेत इंग्लंडचा 15 धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. युवराज सिंह आणि महेंद्रसिंग धोनीने वैयक्तिक शतकांसह चौथ्या विकेटसाठी 256 धावांची भागीदारी रचून या सामन्यात भारताला सहा बाद 381 धावांची मजल मारून दिली होती.
इंग्लिश फलंदाजांनीही भारतीय गोलंदाजांची धुलाई करून त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याची हिंमत दाखवली. पण हाणामारीच्या षटकांत इंग्लंडला विजयासाठी आवश्यक धावांचं समीकरण अधिकाधिक कठीण बनलं आणि विजय आपसूक भारताच्या पारड्यात पडला. टीम इंडियाने पुण्यापाठोपाठ कटकचीही वन डे जिंकून तीन सामन्यांची मालिका खिशात घातली. भारताने इंग्लंडला विजयासाठी 382 धावांचं तगडं आव्हान दिलेलं असतानाही इंग्लंडने 8 विकेट गमावत 366 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून रविचंद्रन आश्‍विनने 10 षटकात 65 धावा देत, 3 विकेट घेतल्या. त्यानंतर जाडेजा आणि भुवनेश्‍वर कुमार यांनी प्रत्येकी एक, तर जसप्रित बुमराने 2 विकेट घेतल्या.
सिक्सर किंग युवराजचं खणखणीत दीडशतक आणि महेंद्रसिंह धोनीच्या 134 धावांच्या जोरावर, टीम इंडियाने इंग्लंडसमोर 382 धावांचं आव्हान ठेवलं होतं. कटक वन डेत युवी-धोनीच्या धाकड फलंदाजीमुळे, भारताला निर्धारित 50 षटकात 6 बाद 381 धावा करता आल्या. युवराजने 127 चेंडूत 21 चौकार आणि 3 षटकारांसह 150 धावा केल्या. तर धोनीने 10 चौकार आणि 6 षटकारांसह 122 चेंडूत 134 धावा कुटल्या.  या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 256 धावांची भागीदारी रचली.
या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार इयान मॉर्गनचा तो निर्णय ख्रिस वोक्सने सार्थ ठरवला. ख्रिस वोक्सनं अल्पावधीतच भारताच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. लोकेश राहुल पाच, शिखर धवन अकरा आणि विराट कोहली आठ धावांवर बाद झाले. त्यामुळे भारताची स्थिती 3 बाद 25 अशी केविलवाणी झाली. यानंतर आलेल्या युवराज सिंह आणि महेंद्रसिंह धोनी यांनी भारताचा डाव सावरला. आधी दोघांनी एकेरी-दुहेरी धावा घेतल्या, मग जम बसल्यावर युवीने ठेवणीतले फटके बाहेर काढले. त्याने 56 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. पहिल्यापासूनच त्याच्या खेळीत जबरदस्त आत्मविश्‍वास दिसत होता. अर्धशतकानंतर युवीने इंग्लिश फलंदाजांची पीसं काढायला सुरुवात केली. युवराजने 98 चेंडूत शतक पूर्ण केलं. युवराजचं हे कारकिर्दीतील 14 वं शतक आहे.
युवराजने यापूर्वी 2011 च्या विश्‍वचषकात शतक ठोकलं होतं. त्यानंतर आता सहा वर्षांनी युवराजला शतक करता आलं. युवराजचं हे भारतातील 7 वं तर इंग्लंडविरुद्धचं चौथं शतक आहे. शतकानंतर सुसाट सुटलेल्या युवीने स्वत:च्या सर्वोच्च 139 धावांचा विक्रमही मोडला. युवीने 126 चेंडूत 150 धावा केल्या. मात्र एक फटका खेळण्याच्या नादात वोक्सच्या चेंडूवर झेलबाद झाला. युवराज आऊट झाल्यानंतर आलेल्या पुणे मॅचचा हिरो केदार जाधवने छोटा पॅक बडा धमाका केला. केदारअवघ्या 10 चेंडूत 22 धावा करुन माघारी परतला. त्यादरम्यान धोनीनेही 68 चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. मग धोनीनेही आक्रमण करत फटकेबाजी सुरु केली. धोनीने 106 चेंडूत शंभर धावा केल्या. धोनीचं हे कारकिर्दीतील दहावं वन डे शतक ठरलं. दरम्यान, धोनीने भारतात 4000 धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली आहे. असा पराक्रम करणारा तो सचिन तेंडुलकरनंतर दुसराच फलंदाज आहे. शतकानंतर धोनीने आक्रमणाला सुरुवात केली. चौफेर फटकेबाजी करत धोनीने इंग्लिश खेळाडूंना चहूबाजूंनी पळवलं. मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या नादात तो 134 धावांवर बाद झाला. यानंतर मग हार्ड हिटर हार्दिक पांड्याने 9 बॉलमध्ये 2 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 19 धावा केल्या. तर जाडेजानेही 8 चेंडूत प्रत्येकी 1 चौकार-षटकारांसह नाबाद 16 धावा केल्या. त्यामुळे भारताला 50 षटकात 381 धावांचा डोंगर उभारता आला.