Breaking News

रुटला आऊट देण्यावर आक्षेप, अंपायरविरुद्ध इंग्लंडची तक्रार

नागपूर, दि. 31 - भारताविरुद्धच्या टी ट्वेण्टी सामन्यात पंचांच्या ढिसाळ निर्णयाचा फटका बसल्याची खंत इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने व्यक्त केली. त्यामुळेच इंग्लंडचा संघ अंपायर शमशुद्दीन यांची तक्रार करण्याच्या तयारीत आहे. विराट कोहलीच्या टीम इंडियानं नागपूरच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात इंग्लंडवर पाच धावांनी सनसनाटी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. मात्र या विजयानंतर अंपायर शमशुद्दीन यांच्या एका निर्णयाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.
इंग्लंडला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी आठ धावांचीच आवश्यकता होती. भारताकडून जसप्रीत बुमराह ती ओव्हर टाकत होता. तमाम भारतीयांची धाकधूक वाढत असताना सर्वांच्या नजरा बुमराहवर होत्या. बुमराहने पहिल्याच बॉलवर ज्यो रुटला चकवा दिला. बॉल त्याच्या पॅडवर जाऊन आदळल्याचं सर्वांनी पाहिलं. भारतीय खेळाडूंनी अपिल केली आणि अंपायर शमशुद्दीन यांनी आऊट दिलं. खरं तर बॉल ज्यो रुटच्या पॅडवर आदळण्यापूर्वी त्याच्या बॅटची कडा घेऊन गेल्याचं रिप्लेमध्ये दिसलं. अंपायरच्या निर्णयावर ज्यो रुटनेही संताप व्यक्त केला होता. कारण रुट सेट फलंदाज होता आणि इंग्लंडला गरज होती त्याचवेळी त्याची विकेट गेली. त्यामुळे हा सामना भारताच्या बाजूने झुकला.