Breaking News

देशात सर्वात जास्त मृत्यू रस्ते अपघाताने

। रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त चिन्मय पंडित यांचे प्रतिपादन

अहमदनगर, दि. 23 - देशात सर्वात जास्त मृत्यू हे पूर, भुकंप, खून यांच्यामुळे नाही तर रस्ते अपघातात होतात. त्यामध्येही दारू पिल्यामुळे जास्त अपघात  होतात. शिस्त पाळली जावी, म्हणून रस्ता सुरक्षा अभियान सतत साजरा केला जातो. मानवी आयुष्य किंमती आहे. एकजरी जीव वाचविला तरी पुण्य आहे. काही  लोक नि:स्वार्थपणे आपले काम करतात. पण एखाद्याच्या चुकीमुळे दुसर्‍याचा नाहक जीव जातो, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित यांनी  केले.
रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अशोका बिल्डकॉन, लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जेऊर टोल नाका येथे शालेय विद्यार्थी व  वाहन चालकांसमोर प्रबोधन करताना चिन्मय पंडित बोलत होते. याप्रसंगी टोल नाक्याचे मॅनेजर डि.वाय.आव्हाड, संतोष कुलकर्णी, लायन्स क्लबचे प्रोजेक्ट  चेअरमन दिलीप कुलकर्णी, संतोष मानकेश्‍वर तसेच यशश्री अ‍ॅकॅडमीचे पवार, सा.बां. विभागाचे ढोले, आरटीओ अधिकारी आर.टी.गिते, दरगोडे, केंद्रे, वडितके,  फटांगरे, शेख, पल्लवी दौड आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना चिन्मय पंडित म्हणाले, वाहन चालवितांना थोडी शिस्त पाळली तर  सिग्नल न पाळणे, कायदा तोडण्यात लोक प्रतिष्ठा मानतात. यासाठी  नागरिकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. तुम्हाला जो बदल घडवायचा आहे, तो स्वत:पासून करा, यासाठी कायदे, शिस्त याचे पालन करा, असे ते म्हणाले.
याप्रसंगी आरटीओ अधिकारी आर.टी गिते मार्गदर्शन करताना म्हणाले, रस्ता सुरक्षा हा विषय मोठी समस्या बनली आहे. वाहनांना जर रिफ्लेटिंग टेप नसेल तर  रात्रीच्यावेळी मागुन येणार्‍या वाहनाची धडक बसण्याची शक्यता असते. रात्रीचे अपघात का होतात? त्याचे कारण रिफ्लेक्टर नसणे त्यामुळे वाहन चालकांना हेड  लाईटवर अवलंबून रहावे लागते. ऊस वाहतुक करणारे ट्रॅक्टर, ट्रेलर यालाही टेप असावे. यासाठी सर्वांनीच अपघात विरहित जीवन जगण्याचा संकल्प करावा,  असे यावेळी गिते म्हणाले.
मालमोटार युनियनचे बाबा सानप यांनीही लार्सन अ‍ॅण्ड ट्रुब्रो कंपनीचे शहरामध्ये खूप योगदान आहे. रोड सेफ्टी, झाडे लावले, हे उपक्रम सामाजिक हित, सुरक्षा  याचा विचार करुनच केले जाते. जिल्ह्यामध्ये 14 लाख दुचाकी, 20 ट्रॅक्टर, 20 हजार कार, एवढी वाहने आहेत. त्यासाठी जागृती होणे गरजेचे आहे.  दिलीप  कुलकर्णी यांनी सिग्नलचे टाईम लिमिट कमी करावे, सावेडीत लहान मुलांसाठी दोन पोलिस ठेवावेत, काही लोकांनी आपल्या फायद्यासाठी डिव्हायडर मध्येच तोडले  आहेत, ते दुरुस्त करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.सूत्रसंचालन संतोष कुलकर्णी केले तर आभार डि.वाय.आव्हाड यांनी मानले.