Breaking News

लक्ष्मीच्या मागे धावणार्‍या विष्णू भक्तांच्या उज्वल कमाईचे पुराण

नाशिक, दि. 18 - अलिकडच्या काळात अवघा समाज विविध मोर्चांनी अगदी ढवळून निघाला आहे. मराठा आणि बहुजन क्रांतीमोर्चांचा अपवाद सोडला तर उर्वरित सर्व मोर्चांमध्ये कुणीतरी लाखो करोडोची फसवणुक केली म्हणून गुंतवणूकदारांनी काढलेल्या मोर्चांचाच भरणा मोठा असल्याचे निरिक्षण नोंदविले गेले आहे. जनतेच्या दैनंदिन गरजांसाठी म्हणजेच मुलभुत सोयीसुविधा किंबहुना खर्‍या अर्थानेै घटनात्मक हक्क अधिकारांसाठी निघालेले मोर्चे या गर्दीत हरवून गेले आहेत. थोडक्यात जनतेची क्रयशक्ती कुणासाठी कोण वेठीस धरते आहे? हा गंभीर प्रश्‍न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
सध्या कुठलेही वृत्तपत्र हाती घेतले तर एक बातमी हमखास वाचायला मिळते. अमुक एका फायनान्स कडून हजारो गुंतवणुकदारांची लुट. संचालकांचा पोबारा; या  मथळ्यासोबतच अधूनमधून अमूक एका फायनान्स कंपनीकडे खंडणी मागीतली म्हणून दोन/चार जणांवर गुन्हा दाखल; खून दरोडे, या गुन्हे प्रकारातील बातम्यांची  जागा फसवणुक किंवा तत्सम प्रकाराशी संबंधित खंडण्यांच्या बातम्यांनी घेतली आहे. काय सुरू आहे हे सारं? कोण जबाबदार आहे या प्रकाराला?
या प्रश्‍नांची उत्तरे शोधतांना अनेक कंगोर्‍यांना स्पर्श करावा लागतो आणि मग कळत नकळत गुंतवणुकदारांपासून पोलीस यंत्रणेपर्यंत सारेच भरडले जातात. या  दोघांनाही खेळकरपणे खेळविणारा मालक संचालक मात्र सहीसलामत सुटतो. त्याला जबाबदार कोण? तर जे खेळवले गेले किंबहुना स्वतःहून खेळत राहिले ते  गुंतवणुकदार आणि काही अंशी पोलीस यंत्रणा.
या दोन जबाबदार घटकांमध्ये अशा फसवणुकीला सर्वार्थाने गुंतवणुकदार हेच जबाबदार आहेत. आपण कमावलेली (मार्ग कुठलाही असु द्या) कमाई जिथे गुंतवणार  आहोत, ती कंपनी किंवा कंपनीचा संचालक परतावा देण्यास लायक आहे का? त्याची पुर्वपिठीका काय आहे. आर्थिक क्षेत्राशी संबंधित किंवा अन्य प्रकारात  त्याच्याविरूध्द कुठे गुन्हे दाखल तर नाहीत ना? याची शहनिशा करून गुंतवणुक करण्याची तसदी गुंतवणुकदार घेत नाहीत. शहरातील एखाद्या प्रतिष्ठीताने,  राजकारण्याने किंवा समाजकारण्याने डोक्यावर हात ठेवला म्हणून तेव्हढ्याच पात्रतेवर, कमी वेळात अधिक परतावा मिळण्याच्या लालचेने हजारो, लाखोच्या  पटीत गुंतवणुक केली जाते. आणि मग जेंव्हा सारी गुंतवलेली कमाई लुटून तो संचालक गाव सोडून जातो तेंव्हा पोलीसांच्या नावाने बोंबा मारल्या जातात. मोर्चे  काढले जातात. या मोर्चात तत्कालीन परिस्थितीत संचालकांच्या डोक्यावर हात ठेवलेला दादा, नाना, भाऊ देखील कमरेचं डोक्याला गुंडाळून सहभागी होतो. मग  सांगा दोष कुणाचा? पोलीसांवर दबाव टाकण्यासाठी काढलेला असा मोर्चा काय फलीत देईल?
या परिस्थितीत पोलीसांचा कुठलाच दोष नाही त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात कुठलेच हशील नाही हे पुर्ण सत्य मात्र नाही. या परिस्थितीला अवघी  पोलीस यंत्रणा जबाबदार नसली तरी पोलीस यंत्रणेतील काही घटक मात्र नक्कीच जबाबदार आहेत हे नाकारता येणार नाही. असे गुंतवणुकीचे फसवे उद्योग जेंव्हा  सुरू असतात तेंव्हा पोलीस यंत्रणेतील काही महाभागांना या बाबी निदर्शनास येत असतानाही त्यांना पायबंद घालण्याएएवजी त्यांच्याशी हितसंबंध प्रस्थापित  करतात आणि जेंव्हा गुंतवणुकदारांना गंडवले जाते तेंव्हा या काही महाभागांच्या पापकर्माची खेटरं अवघ्या पोलीस यंत्रणेच्या माथ्यावर मारली जातात. केबीसी  घोटाळा प्रकरणात हाच अनुभव आला आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खोदून दै. लोकमंथनने आर्थिक गुन्हे शाखेच्या हवाली केले होते. तथापि तत्कालीन अधिकारी  मंडळींनी जाणीवपुर्वक केबीसी संचालकांना चाल दिली असा आमचा अनुभवावर आधारित दावा आहे. तेव्हाही पोलीस आयुक्तालयातील काही प्रामाणिक  अधिकार्‍यांनी केबीसीच्या मुसक्या आवळण्याचे फर्मान सोडूनही काही महाभागांचे हितसंबंध चव्हाण यांना सिंगापूरला पाठविण्यास उपयोगात आणले गेले.  केबीसीच्या शिळ्या कढीला उत आणण्याचे कारण इतकेच की, आजही परिस्थिती वेगळी नाही. केबीसी सम काही मंडळी गुंतवणुकदारांना ठगविण्याचे काम  आजही राजरोसपणे करीत आहे, ही बाब पोलीस यंत्रणेला अवगत नसेलही मात्र यंत्रणेत काम करणार्‍या महाभागांना नक्कीच ठाऊक आहे. आपल्या वरिष्ठांना ते  एक तर भनक लागू देत नाहीत किंबहुना त्यांची दिशाभूल करीत आहेत. जो कुणी या भामट्यांविरूद्द आवाज उठविण्याचा प्रयत्न करतो त्याच्याविरूद्द खंडणीचा  गुन्हा दाखल करण्याचा सल्लाही या महाभागांकडून संचालकांना दिला जातो. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे खंडणीचे गुन्हे दाखल केले गेले आहेत. फिर्यादी आणि  आरोपी यांची पुर्वपिठीका पोलीसांनी अशा प्रकरणांत निष्पक्षपणे तपासली तर कदाचित नंतरचे महाभारत - रामायण गायनाची वेळ आधनिक लवकुशांवर येणार  नाही. आणि लक्ष्मीच्या मागे धावणार्‍या विष्णूच्या भक्तांनाही फौजदारी गुन्ह्यांची पिठीका लपवितांना उज्वल यशाचे खोटे पुराण कथन करावे लागणार नाही तुर्तास  इतकेच.
आर्थिक दरोडेखोरी; खरे दोषी कोण?
केबीसी प्रकरणातही लोकमंथनने आर्थिक गुन्हे शाखेतला सजग केले होते. तथापि कारवाईऐवजी हितसंबंध प्रस्थापित झाले. आजही वेगळी परिस्थिती नाही.  निष्पक्षपणाच्या अभावामुळे फसवणुकीचेे रामायण गाण्याची वेळ आधुनिक लवकुशांवर येते आणि लक्ष्मीच्या मागे धावणार्‍या विष्णू भक्तांची उज्वल यशाची कमार्ई  टवटवीत होते.