धोक्याची सूचना देणार्या फलकांकडे लक्ष द्याः गिते
। लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रबोधन
अहमदनगर, दि. 20 - भारतात 1 लाख लोक रस्ते अपघात मृत्यू पावतात. यासाठी वाहन चालविताना धोक्याची सूचना देणार्या फलकाकडे दुर्लक्ष केल्यास मोठा अपघात घडू शकतो. वाहन चालकाच्या चुकीमुळे 73% अपघात होतात, तर खड्डे, स्पीडब्रेकर यामुळेही मोठ्या प्रमाणावर अपघात होतात. दुचाकीस्वारांनी वाहन चालविताना हेल्मेटचा अवश्य वापर करावा. कारण रस्ते अपघातात 50% दुचाकीस्वार मृत्यू पावतात, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आर. टी. गिते यांनी सांगितले.एमआयडीसीतील लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत अधिकारी व कर्मचार्यांचे प्रबोधन करताना श्री. गिते बोलत होते. याप्रसंगी कंपनीचे जॉईंट जनरल मॅनेजर अरविंद पारगांवकर, एचआर हेड नागेश आढाव, शैलेंद्र भालेकर, डी. के. कुलकर्णी आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गिते पुढे म्हणाले की, फाजील आत्मविश्वास बाळगून वाहन चालवू नये. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करू नये. दोन वाहनांत जास्तीचे अंतर असल्यास अचानक पुढचे वाहन थांबल्यास अपघात टळतो. वाहन चालविताना एकाग्रता असायला हवी. ती भंग होता कामा नये. पादचारी रस्ता ओलांडत असेल, तर त्यांना आधी जाऊ दिले पाहिजे. सिग्नल सुरू असताना मध्येच काहीजण सिग्नल तोडून जातात. त्यामुळे अपघात घडल्याची अनेक उदाहरणे असून, यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काहीजण कायमचे जायबंदी झाले आहेत, असे ते म्हणाले.पारगांवकर यांनी यावेळी आरटीओ अधिकार्यांचे आभार मानून लार्सन अॅगण्ड टुब्रो कंपनीत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रबोधन केल्याबद्दल धन्यवाद देत त्यांच्या जीवनात घडलेले किस्से कथन केले. सूत्रसंचालन शैलेंद्र भालेकर यांनी केले, तर आभार अरविंद पारगांवकर यांनी मानले.
