Breaking News

कोलकाता वन डे, भारताकडे इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची संधी

कोलकाता, दि. 22 - कोलकात्याचं ईडन गार्डन्स स्टेडियम भारत आणि इंग्लंड संघांमधल्या तिसर्‍या आणि अखेरच्या वन डे सामन्यासाठी सज्ज झालं आहे. त्यामुळे टीम इंडिया आता पुणे आणि कटक वन डे नंतर कोलकात्यातही इंग्लंडला पराभवाची धूळ चारुन मालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करेल.
टीम इंडियाने विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळताना पुणे आणि कटकच्या लढाया जिंकून या वन डे मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता आजचा सामना जिंकून मालिकेत इंग्लंडवर 3-0 असा निर्विवाद विजय साजरा करण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. कोलकात्यातला हा सामना म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारताचा अखेरचा वन डे सामना आहे. त्यामुळे या लढाईत कोहली काही नवीन प्रयोग करून पाहणार का, हे पाहणंही उत्सुकतेचं ठरेल.