Breaking News

शिवसेना-भाजपची युती तुटली, महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर लढणार

मुंबई, दि. 27 - ‘राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका यापुढे स्बळावर लढणार.’ अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. गोरेगावच्या पदाधिकारी मेळाव्यात हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये आणि जयघोषामध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. मुंबईसह 10 महापालिकांच्या  निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष रंगणार आहे. विशेष म्हणजे गोरेगावातील शिवसैनिक मेळाव्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी हजेरी लावली  होती. शिवसैनिकांच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेलं. आणि याच आवेशपूर्ण वातावरणात उद्धव ठाकरेंनी स्वबळावर भगवा फडणविण्याची घोषणा केली.
‘गेली 25 वर्ष शिवसेना युतीत सडली. पण आता ही फरफट होणार नाही. तुम्ही मला वचन देत असाल तर मी निर्णय घेतो आहे की, आता यापुढे शिवसेना  महाराष्ट्रात भगवा फडकवेल. कोणाच्याही समोर युतीसाठी कटोरं घेऊन जाणार नाही. महाराष्ट्रात कुठेही यापुढे मी युती करणार नाही.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी  भाजपशी काडीमोड घेतल्याचं जाहीर केलं.
‘युतीच्या बैठकीत 114 जागांची मागणी भाजपकडून करण्यात आली. हा शिवसेनेचा अपमान होता. त्यानंतर कोणताही फोन मला आला नाही. आमच्या अनिल  देसाईंना फोन आला होता. ‘बघू युती झाली तर वैगरे..’ असं त्यावेळी फोनवर त्यांनी सांगितलं.’ ‘शिवसेनेची गेली 25 वर्ष युतीमध्ये सडली. पण आता यापुढे मी  कुणासमोर झुकणार नाही, वाकणार नाही.  शिवसेनेच्या नव्या वाटचालीची घोषणा करतो आहे. मी निखार्‍यावर चालणार आहे. तुम्हालाही माझ्यासोबत  निखार्‍यासोबत चालावं लागणार आहे. त्यामुळे यापुढे शिवसेना महाराष्ट्रात स्वबळावर भगवा फडकवेल. शिवसेना महाराष्ट्रात कुठेही युती करणार नाही. यापुढे  कुणासमोरही कटोरं पसरणार नाही.’