Breaking News

कुक्कुट पालन हा शेतीला पूरक व्यवसाय-उद्योजक उद्धव आहिरे

नाशिक, दि. 13 - कुक्कुट पालन व्यवसायामध्ये दरवर्षी 15 ते 18 टक्यांनी वाढ होत आहे. पुढचे दहा वर्ष हि वाढ होत राहणार आहे. दर  महिन्याला नाशिकमध्ये या व्यवसायात एक कोटी कोंबड्यांचे उत्पादन होत असल्याने कुक्कुट पालन हा शेतीला पूरक व्यवसाय असल्याचे उद्योजक उद्धव आहिरे  यांनी सांगितले. ते के टी एच एम महाविद्यालयाच्या वतीने आयोजित डॉ वसंतराव पवार व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ’जिवन यांना कळले हो’ या विषयावर गुंफतांना  रावसाहेब थोरात सभागृहात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विश्‍वास देवकर, संस्थेच्या, सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार, चिटणीस डॉ सुनील ढिकले, संचालक नाना  महाले, कृष्णाजी भगत, भाऊसाहेब खताळे, रवींद्र देवरे, डॉ अशोक पिंगळे, अ‍ॅड एकनाथ पगार, प्राचार्य डॉ. आर डी दरेकर, शिक्षणाधिकारी डॉ.डी.डी.काजळे, प्रा  एस के शिंदे, सी,डी,शिंदे,  डॉ. एन एस पाटील, उपप्राचार्य डॉ.एम.बी.मत्सागर, प्रा. प्राची पिसोळकर उपस्थित होते.
आपला जीवनपट उलगडताना उद्धव अहिरे यांनी विद्यार्थ्यांना अनुकूल परिस्थिती असताना ती प्रतिकूल करू नका, तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्याचा  योग्य तो उपयोग करून शिक्षणामध्ये चांगली प्रगती करून, जीवनात यशस्वी व्हा असे सांगून चांगले उद्योजक होण्यासाठी सेमिनार, व्याख्याने व व्यावसायिक  प्रशिक्षण घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात ज्येष्ठ पत्रकार विश्‍वास देवकर यांनी डॉ. वसंतराव पवार यांनी त्यांच्या कर्तुत्वाच्या कहाण्या पेरून ठेवल्या आहेत, त्या कहाण्या भविष्यात  तुमच्या झाल्या पाहिजेत. गुंतागुंतीच्या आपल्या जीवनातही संकटात तुम्ही संधी शोधली पाहिजे. जीवनात यशस्वीतेकडे वाटचाल केली पाहिजे असे शेवटी  सांगितले.