Breaking News

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा इंग्लडवर विजय

पुणे, दि. 16 - कर्णधार विराट कोहली आणि त्याचा मराठमोळा शिलेदार केदार जाधव या दोघांनीही जबरदस्त शतकं ठोकून, पुण्याच्या पहिल्या वन डेत इंग्लंडला तीन विकेट्सनी नॉकआऊट पंच दिला. शतकी खेळी करणारा केदार जाधव मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी ठरला.
या सामन्यात इंग्लंडने भारतीय गोलंदाजांची धुलाई करून 50 षटकांत 7 बाद 350 धावांचा डोंगर उभा केला होता. पण विराट आणि केदारने पाचव्या विकेटसाठी  147 चेंडूंत 200 धावांची भागीदारी रचून इंग्लंडचा तो डोंगर लिलया सर केला. विराटने वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं सत्ताविसावं शतक ठोकलं तर केदारने वन  डेतलं दुसरंच शतक साजरं केलं. विराटने 105 चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांसह 122 धावांची बरसात केली. तर केदारने 76 चेंडूंमध्येच 12 चौकार  आणि चार षटकारांसह 120 धावांची लयलूट केली.