Breaking News

उत्तर प्रदेशसाठी भाजपचं घोषणापत्र, राम मंदिराच्या मुद्द्याला पुन्हा हात

नवी दिल्ली, दि 29 - उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपलं निवडणूक घोषणापत्र पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशित केलं. या घोषणापत्रात भाजपने उत्तर प्रदेशच्या विकासाच्या नऊ मुद्द्यांवर भर दिला आहे. भाजपने या निवडणुकीसाठी महिला सुरक्षेपासून ते तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे आणि शेतकर्‍यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे, पक्षाने या निवडणुकीसाठी हिंदुत्वाचा राग आळवला असून, राम मंदिरासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे.
राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलना भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी, जर उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आल्यास, घटनेच्या चौकटीत राहून राम मंदिर लवकरच  बांधू, असं सांगितलं आहे. याशिवाय भाजपने शेतकर्‍यांसाठी अनेक आश्‍वासने दिली आहेत. घोषणापत्रानुसार, भाजपचे सरकार आल्यास शेतकर्‍यांच्या कर्जावर  व्याज आकारले जाणार नाही, शेतमजुरांचा दोन लाखापर्यंतचा विमा उतरवणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच ऊस उत्पादक शेतकर्‍यांना कारखान्याबाहेरच  ऊसाचे बिल तत्काळ चेकने दिले जाईल, असं सांगितलं आहे.