चांदोलीत विद्यार्थी वारणेत बुडाला
सांगली, दि. 29 - चांदोली धरण परिसर पाहण्यासाठी गेलेला वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे महाविद्यालयाचा विद्यार्थी अक्षय शोक पाटील (22, रा जाफळे, ता. पन्हाळा) हा धरणातून सोडलेल्या पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेला. ही घटना उखळू (ता. शाहुवाडी) येथील वारणा नदीवरील पुलानजीक घडली. त्याच्याबरोबर असलेल्या दोन विद्यार्थ्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. रात्रीपर्यंत शोधमोहीम राबवूनही अक्षयचा शोध लागला नाही.वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य विभागातील शेवटच्या वर्षांचे 40 विद्यार्थी खासगी वाहनातून सकाळी चांदोली धरण पाहण्यासाठी गेले होते. धरण पाहण्यासाठी आवश्यक पास त्यांच्याकडे नव्हता.
धरणाच्या खालच्या बाजूला उखळूनजीक वारणा नदीवरील पुलाच्या परिसरात ते वारणा नदीच्या पात्रात उतरले. यावेळी अक्षय पाण्यात बुडू लागल्याचे लक्षात येताच, त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. त्याला हात देण्याचा प्रयत्न करत असतानाच अक्षय पाण्यात बुडाला. तो पुन्हा दिसलाच नाही. विद्यार्थ्यांनी आरडा-ओरडा केल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अक्षयचा शोध लागला नाही. या घटनेनंतर सर्व विद्यार्थी घाबरुन गेले.
त्याच्या मित्रांनी चांदोली धरणाच्या गेटवर पाटबंधारे विभागाच्या कर्मचार्यांना याबाबत ातडीने माहिती दिली. पाटबंधारे विभागाने तात्काळ नदीत सोडलेले पाणी बंद केले. पण ही घटना उखळू हद्दीकडील बाजूने घडल्याने, फिर्याद कोणत्या पोलिस ठाण्याला द्यायची?, याबाबत संभ्रम निर्माण झाला. यामुळे शोधकार्यास उशीर झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अक्षयचे वडील अशोक पाटील यांनी कोकरुड पोलिस ठाण्यात माहिती दिली.
कोकरुड पोलिसांनी शाहुवाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर वेगाने शोधकार्य सुरु झाले. दुपारपासून विद्यार्थी व स्थानिक नागरिकांनी वारणा नदीपात्रात शोध घेतला, मात्र अक्षयचा ठावठिकाणा लागला नाही. रात्रीपर्यंत पाण्याचा प्रवाह कमी होत होता. सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबवूनही अक्षय सापडला नाही. घटनेची माहिती वारणा महाविद्यालय व जाफळे येथे समजताच नातेवाईक व प्राध्यापक घटनास्थळाकडे रवाना झाले.