Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्या 766 इच्छुकांच्या मुलाखती

सातारा, दि. 20 (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाने तीन दिवसांपासून प्रत्येक गट व  गणातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. राष्ट्रवादीकडून या कालावधीत तब्बल 766 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून प्रत्यक्ष  निवडणुकीसाठी कोणाला तिकीट मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी दि. 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठीची अचारसंहिता लागू झाली असून राष्ट्रवादी पक्षाने निवडणूक  जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी प्रथम राष्ट्रवादी भवनात निवडणूक अर्जांची विक्री करण्यात आली. तब्बल 1300 ते 1400 इच्छुकांनी अर्ज विकत नेले  होते.
त्यानंतर सोमवारपासून विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील (तात्या), आ. शशिकांत शिंदे, आ.  शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी तालुकानिहाय इच्छुक उमेदवारांच्या राष्ट्रवादी  भवनात मुलाखती घेतल्या. पहिल्या दिवशी 212 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तर दुसर्‍या दिवशी 226 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. शेवटच्या दिवशी  सातारा, पाटण आणि कराड या तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
यामध्ये सातारा 117, पाटण 86 आणि कराड 133 असे मिळून एकूण अखेरच्या दिवशी तब्बल 336 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. राष्ट्रवादीकडून तीन  दिवसांच्या कालावधीत 766 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहे. जिल्हा परिषदेच्या 64 आणि पंचायत समितीच्या 128 च्या जागांसाठी या  मुलाखती झाल्या असून इच्छुक उमेदवारांमधील कोणा कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.