Breaking News

मच्छिलमध्ये हिमस्खलनात 5 जवान शहीद, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश

श्रीनगर, दि. 31 - जम्मू काश्मीरच्या मच्छिल भागात झालेल्या हिमस्खलनात पाच जवान शहीद झाल्याची माहिती आहे. दुर्दैवाने यामध्ये महाराष्ट्रातील तीन जवानांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरमधील गुरेझ भागात हिमस्खलन झाल्याची घटना ताजी असतानाच 28 जानेवारीला मच्छिल भागातही हिमस्खलन झालं. यामध्ये पाच जवान गाडले गेले होते, मात्र त्यांना जिवंत बाहेर काढण्यात आलं. परंतु मच्छिल भागातील हवामान आणि योग्य ती वैद्यकीय मदत मिळू न शकल्यामुळे पाचही जणांचा मृत्यू झाला.
हिमस्खलनामध्ये महाराष्ट्रातील तिघे जवान शहीद झाले. सातार्‍यातील वाई तालुक्यातले 30 वर्षीय शिपाई गणेश किसन ढवळे, सांगलीतील कवठे महंकाळचे 34 वर्षीय नाईक रामचंद्र श्यामराव माने, आणि परभणीतील चे 26 वर्षीय शिपाई बालाजी भगवानराव अंबोरे यांचा समावेश आहे. तामिळनाडूच्या मदुराईतील 27 वर्षीय जनरल थामोथारा कन्नन आणि गुजरातच्या भावनगरमधील 27 वर्षीय देवा हाझा भाई परमार हे जवानही हिमस्खलनात शहीद झाले आहेत.