Breaking News

शशीकला नटराजन 29 जानेवारीला मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार?

चेन्नई, दि. 17 - तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी एआएडीएमके पक्षाच्या सरचिटणीस शशीकला नटराजन लवकरच विराजमान होण्याची शक्यता आहे. एआएडीएमने याबाबत काहीही अधिकृत घोषणा केली नसली तरीही तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात सध्या याबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे सध्याचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांची गच्छंती होण्याची दाट शक्यता आहे. ‘सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जानेवारीला शशीकला नटराजन या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील.’
शशीकला नटराजन यांची एआएडीएम पक्षाच्या सरचिटणीसपदी 29 डिसेंबरला निवड करण्यात आली होती. जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूमध्ये मोठ्या  प्रमाणात राजकीय उलथापालथ होईल असा जाणकारांनी अंदाज वर्तविला होता. जयललिता यांच्या निधनानंतर पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली  होती. मात्र, अवघ्या महिन्याभरातच त्यांना या पदावरुन पायउतार व्हावं लागण्याची शक्यता आहे.