Breaking News

अंडर-19 क्रिकेट टीमच्या फिटनेस ट्रेनरचा मृतदेह हॉटेलमध्ये आढळला

मुंबई, दि. 29 - मुंबईतील एका हॉटेलमध्ये भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर राजेश सावंत यांचा मृतदेह आढळून आला आहे. झोपेतच मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. यासंबंधीत मुंबई पोलिस अधिक तपास करत आहेत. राजेश सावंत सकाळी सराव सत्रासाठी न आल्याने चौकशी केली असता मुंबईत ते ज्या हॉटेलमध्ये राहत होते, त्या ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आला.
भारतीय अंडर-19 क्रिकेट संघ उद्यापासून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला सुरुवात करणार आहे. वानखेडेवर उद्यापासून या मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेत पाच वन डे आणि दोन चार दिवसीय सामने खेळले जाणार आहेत. राजेश सावंत यांचा प्रशिक्षक म्हणून नुकत्याच झालेल्या इराणी चषकातही सहभाग होता. त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या विविध क्रिकेट संघांमध्ये प्रशिक्षक म्हणून कर्तव्य बजावलं आहे. तसेच ते अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकही होते.