Breaking News

जतजवळून सिमेंटचा ट्रक पळविला

सांगली, दि. 27 - जत तालुक्यातील विजापूर-गुहागर राज्यमार्गावर मुचंडी ते जतदरम्यान एका ट्रक चालकास लोखंडी टॉमीने मारहाण करुन त्याच्याकडील रोख  दोन हजार पाचशे रुपये व सिमेंट भरलेला ट्रक (क्र. एमएच 12/एफ झेड 5773) असा सतरा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याच्या आरोपावरुन ट्रक चालक  कानिफनाथ दत्तात्रय कुंदळे (33, रा. भोरे, ता. दौंड, जि. पुणे) यांनी पाच जणांविरोधात जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यापैकी चार जणांना अटक  करण्यात आली असून एक फरारी आहे. ही घटना रात्री उशिरा घडली.कानिफनाथ कुंदळे हे सिमेंटने भरलेला ट्रक घेऊन कर्नाटकातून महाराष्ट्रात येत होते.  त्यावेळी मुचंडी ते जत या मार्गावर शरद उत्तम चव्हाण (28), उमेश रमेश राठोड (30), संभाजी उर्फ आबा भानुदास खांडेकर (29, रा. तिघे कुणीकोणूर, ता.  जत) व पवन श्रींमत सूर्यवंशी (28, रा. जत) आणि इतर एक अनोळखी तरुण अशा पाच जणांनी हा ट्रक अडवून ट्रक चालकाकडे पैशाची मागणी केली. त्याने  पैसे देण्यास नकार दिल्याने त्याला लोखंडी टॉमीने मारहाण करण्यात आली. त्यांच्याजवळील रोख दोन हजार पाचशे रुपये व सिमेंट भरलेला ट्रक घेऊन त्यांनी  पलायन केले.
या घटनेची माहिती रस्त्यावरुन ये-जा करणार्‍या प्रवाशांनी जत पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.  त्यांना जत न्यायालयात उभे केले असता, दोन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास जत पोलिस करत आहेत.