Breaking News

तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आता आधार कार्ड बंधनकारक

तिरुपती (आंध्र प्रदेश), दि. 26 - तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आता आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. बालाजी व्यंकटेश मंदिर प्रशासनाने देव दर्शनासाठी आधारकार्ड सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे. तिरुपती बालाजी मंदिरातील सोयी-सुविधांचा भाविकांकडून गैरवापर होत असल्याचे मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास आले आणि त्यानंतर आधार कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्याचं मंदिर प्रशासनाने सांगितले.
ज्या भाविकांकडे आधार कार्ड नसेल, त्यांना तिरुपती बालाजीचं फक्त मुखरदर्शन घेता येणार आहे. गाभार्‍यात प्रवेश करायचा असल्यास आणि प्रसाद हवा असल्यास आधारकार्ड सोबत ठेवावंच लागेल. अगदीच काही अपवादात्मक कारण असेल, तर आधारकार्ड दाखवण्याला सूट देण्यात येईल. मात्र, तेव्हाही पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र दाखवून दर्शन घेता येणार आहे.
तिरुपती शहर हे आंध्र प्रदेश राज्याच्या दक्षिण टोकावर चित्तूर जिल्ह्यात आहे. तिरुपतीमधील तिरमाला डोंगरावर असलेल्या या बालाजी व्यकंटेश मंदिराला विशेष महत्व आहे. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. भारतातील श्रीमंत देवस्थानांमध्येही तिरुपती बालाजी व्यंकटेश मंदिराची गणना होते. तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना मंदिर प्रशासनाकडून विशेष सुविधा दिल्या जातात. पण भाविकांकडून या सुविधांचा गैरव्यापार होत असल्याने देवदर्शनासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आल्याचे तिरमाला तिरुपतीचे कार्यकारी अधिकारी डी संबाशिव राव यांनी सांगितले आहे.