Breaking News

राजकारणातील भादींचा हैदोस...

दि. 28, डिसेंबर - लोकशाहीत जनतेच्या जागरणाला अनन्य साधारण महत्व असते हे आम्हा भारतीयांना वेगळे सांगण्याची गरज नाही. पण सारे कळत असूनही आम्ही वळणावर  यायला तयार होत नाही. हेच खरे तर दुर्दैव आहे. आम्ही काल म्हटल्याप्रमाणे आमच्या जाणीवाच मेल्यात मग आमच्या हातून संवेदनशील मनाच्या राज्यकर्त्यांना  सत्तेची चावी कशी दिली जाईल. आम्ही मुर्दाड झालोत म्हणून आमचे प्रतिनिधीही मुर्दाड निवडले. असा सारासार कालच्या लेखनाचा विषय होता.
आमचे प्रतिनिधी आमच्यादृष्टीने मुर्दाड आहेत. मात्र एका सोयीच्या अर्थाने त्यांच्या संवेदना मात्र अधिक उठावदार आहेत. ही आजची वस्तुस्थिती आहे. जनतेचे  सामुहिक हित मात्र त्यांच्या संवेदनकक्षेच्या बाहेर राहते एव्हढच. एरवी त्यांच्या संवेदना नेहमीच ओसंडून वाहतांना दिसतात. असो. खरे तर संवेदना हा आजचा  विषय नाही.
आमच्या संवेदना नि-धन झाल्याने आज समाजकारणाचे आणि राजकारणाचेही पार मातेरे झाले आहे. राजकारणातील एकनिष्ठता सत्तेच्या बाजारात लिलाव  होताना दररोज दिसते आहे. कुणी कुठले तत्व अवलंबावे हा ज्याचा त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असला तरी एका रात्रीतून तत्व आणि पाठोपाठ निष्ठा जेव्हा  बदलतांना दिसते तेव्हा या महानुभवांना नेमके तत्वाचे, निष्ठेचे अधिष्ठान कशाशी खातात याची जाण तरी आहे का? ज्याला अक्कल म्हणतात ती तरी सारासार आहे  का असे साधे प्रश्‍नही निरूत्तर करून जातात.
सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. अलिकडच्या काही वर्षात निवडणुकीच्या काळात रात्रीतून पक्षबद्ल करण्याची स्पर्धा वेगाने सुरू होण्याची परंपरा सुरू  झाल्याचे दिसते. खरे तर लोकशाहीमध्ये मतदाराला गुप्त मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. व्यक्ती म्हणून मत द्यायचे स्वातंत्र्य अबाधित आहे. मग तो कुठल्या  पक्षाचा याचा विचार न करता मतदान होऊ शकते. मात्र तो जनमताच्या दृष्टीने देशविकासात, राज्यविकासात, समाजविकासात, पौरूषत्व, मर्दुमकी दाखविणारा  आहे याची खात्री जनतेला पटायला हवी.
मात्र आजच्या राजकारणातील कित्येक महानुभवांना आपल्या कर्तृत्वावर, किंचितही विश्‍वास नाही म्हणून ऐन निवडणुक काळात पक्षांतर करण्याची हौस जागी  होते. अनेकदा या मंडळींना राजकीय वारे कुठल्या दिशेने वाहते याचाही अचुक अंदाज येत नाही. इकडे जाऊ की तिकडे या संभ्रमात तिसराच पर्याय निवडून  सरतेशेवटी तोंडावर पडण्याची, थोबाड फुटण्याची आफत ओढवते या सार्‍या प्रक्रियेत जे सराईत आहेत ते या भवसागरात एक वेळ तरून जातात पण ज्यांची  कारकिर्द खर्‍या अर्थाने सुरू होण्यावर आहे ती सुरू होण्याआधीच संपूष्टात येते असाच काहीसा अनुभव सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी येतो आहे.
नगरपरिषदांच्या निवडणुका संपन्न झाल्यानंतर आता मनपा आणि जिल्हा परिषदा-पंचायत समितीच्या निवडणुकांचा हंगाम येऊ घातलाय. त्यात हेच चित्र दिसू  लागले आहे. श्रावण संपला की भाद्रपद सुरू होतो. त्या काळात रस्त्यावर जे चित्र दिसते त्यापेक्षाही हिन संस्कृती सध्या राजकारणात पक्ष बदलूंनी निर्माण केली  आहे. बिचारे मुकी जनावर कुणीही हाकला, पण या राजकारणातील भादींना कुणी वठणीवर आणायचे? त्यांना वळणावर आणून राजकारणातील हा हैदोस  थांबविण्यासाटी तरी हंगामी संवेदनांना जागवायला मतदारांना कुठलीच हरकत नसावी.