Breaking News

’लास्ट ख्रिसमस’ गाणार्‍या पॉपस्टार जॉर्ज मायकलचं ख्रिसमसलाच निधन

लंडन, दि. 26 - ज्याने ‘लास्ट ख्रिसमस’ म्हणत अवघ्या पॉप जगतावर अधिराज्य गाजवलं, त्या पॉपस्टार जॉर्ज मायकलचं ख्रिसमसच्याच दिवशी निधन झालं. वयाच्या 53 व्या वर्षी इंग्लंडमधल्या राहत्या घरी त्याने अखेरचा श्‍वास घेतला. मायकलच्या अकाली मृत्यूने पॉप जगतात खळबळ उडाली आहे. मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असलं, तरी हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा दावा जॉर्ज मायकलच्या निकटवर्तीयांनी केला आहे.
1963 साली जन्मलेल्या जॉर्जने 80 च्या दशकामध्ये पॉप विश्‍वामध्ये वादळ आणलं होतं. शाळेतील मित्रांसह जॉर्जने व्हाम नावाचा म्युझिक बॅण्ड सुरु केला. ‘केअरलेस व्हिस्पर’ या अल्बमने तेव्हा धुमाकूळ घातला. त्या अल्बमच्या तब्बल 60 लाख प्रती विकल्या गेल्या. जॉर्जच्या सर्व अल्बमच्या मिळून तब्बल 10 कोटी प्रती विकल्या गेल्या आहे. त्यानंतरच्या तीन दशकांमध्ये जॉर्ज मायकलचं गारुड तरुणाईवर कायम राहिलं. गुड लुक्स, स्टेज अपियरन्स आणि लेटेस्ट फॅशन ट्रेण्ड्समुळे जॉर्ज कायमच तरुणाच्या गळ्यातील ताईत बनला.