ज्येष्ठ नेपथ्यकार बापू लिमये यांचे निधन
कल्याण, दि. 26 - बापू लिमये या नावाने परिचित असणारे ज्येष्ठ नेपथ्यकार परशुराम कृष्णाजी लिमये यांचे वयाच्या 88 व्या वर्षी कल्याण येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. मूळचे अमरावतीचे असलेले लिमये यांनी गेली साठ दशके मराठी हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवर रंगकर्मी, नेपथ्य आरेखन, रचना करण्याचे काम केले. प्रसिद्ध नाटककार विजय तेंडूलकर यांच्या ‘गिधाडे’ या नाटकाने त्यांना नेपथ्यकार ओळख म्हणून ओळख मिळवून दिली होती. ‘गोष्ट नेपथ्याची,’ ‘प्रयोग समीक्षा संग्रह’, ‘बखर नेपथ्याची’ ही त्यांची नाटयविषयक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. कारकिर्दीच्या सुरूवातीला त्यांनी मध्य रेल्वेत महसूल विभागात हिंदी अधीक्षक म्हणून नोकरी केली. नोकरीबरोबरच रंगभूमीची सेवाही त्यांनी सुरू ठेवली होती. नाट्यक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.