Breaking News

संवेदनाच ठार मेल्यात, म्हणून!

दि. 27, डिसेंबर - राजकारणात वावरणारी माणूस नावाची जमात गेंड्याच्या कातडीची असावी लागतात. इतकेच नाही तर त्यांचे मनही दगडासारखे बोथटच नव्हे तर निर्जीव असावे लागते. थोडक्यात जाणीवा, संवेदना ठार मेलेल्या असतील तर आणि तरच अशी माणसं राजकारणात तग धरू शकतात, यशस्वी होऊ शकतात. स्वतंत्र धारताच्या इतिहासात अशी अनेक महानुभवांची उदाहरण या गृहीतकाचे साक्षी आहेत.
उदाहरणच द्यायचे झाले तर महात्मा गांधी यांची पुढची पिढी, लालबहाद्दूर शास्त्री यांची पुढची पिढी, अटल बिहारी वाजपेयी यांसारखे अनेक तत्सम महानुभवांचे देता येईल.
म.गांधी, लालबहाद्दूर शास्त्री, सुभाषचंद्र बोस, अटलबिहारी वाजपेयी, दादासाहेब गायकवाड, दादासाहेब रुपवते, यांच्यासारखी संवेदनशिल मनाची माणसं तत्कालीन परिस्थितीची गरज म्हणून अपघाताने किंबहूना त्यांच्या संवेदनशील मनाला असलेली तळमळ म्हणून समाजकारणातून राजकारणात पडली. शंभर टक्के समाजकारण हाच त्यांच्या राजकारणाचा गाभा होता. समाजकारणाला न्याय देण्यासाठी त्यांच्या संवेदनांनी राजकारणाचा मार्ग पत्करला.
भारताच्या लोकशाहीत राजकारणाच्या बदलत्या प्रवाहामुळे, राजकारणाच्या बदलत्या स्वभाव प्रवृत्तीमुळे, राजकारणाच्या जातकुळीमुळे ही माणसं आपोआप राजकीय प्रवाहाबाहेर फेकली गेली किंवा त्यांचे संवेदनशील मन या बदलत्या प्रवाहाला सामोरे जाण्यास तयार झाले नाही. म्हणून स्वतःहून आहे तिथेच थांबली. त्यांच्या पुढील पिढीतही तेच रक्त, तेच संस्कार असल्याने त्या पिढीनेही या प्रवाहात येण्याचे जाणीवपूर्वक टाळले आणि मग हा प्रवाह संवेदनाच ठार मेलेल्या मनाच्या पिढीने अतिक्रमीत केला. त्याचेच परिणाम आपल्या भारत देशाची लोकशाही भोगते आहे.
राजकारणातील संवेदनशील मनाच्या महानुभवांची नंतरची पिढी जशी राजकारणात येण्याचे टाळू लागली तशीच संवेदना ठार मेलेल्या पिढीने राजकारण हेच आपले प्रमुख पसंतीचे क्षेत्र निवडले आणि मग हळूहळू लोकशाहीचे राजकारण घराणेशाहीच्या दिशेने वाटचाल करू लागले अर्थात यातही काही सन्माननीय अपवाद आहेत हे नाकारता येणार नाही..
लोकशाही जसजशी पोक्त होऊ लागली तसतशी ही घराणेशाही आणखी बळकट होऊ लागली. खरेतर उलट परिणाम दिसणे अपेक्षित होते. पोक्तपणा सकारात्मक परिणाम दर्शवितो. इथे मात्र उलटेच चक्र फिरले. का? याचा विचार कुणी करायचा?
उत्तर साधे आहे. आपली लोकशाही बहुमताच्या कडबोळ्यावर उभी आहे. बहुमत देणारे तुम्ही आम्हीच आमच्या जाणीवा संवेदना या संवेदनाहीन सन्मित्रांकडे गहाण ठेवू लागलो म्हणून तर निपजही तिच आमच्या पदरात पडली. थोडक्यात राजा-प्रजा-राजा या नात्याचे चक्र आहे. आमच्या संवेदना जिवंत ठेवण्यात आम्हाला यश आले असते तर संवेदना ठार मेलेल्या राजकारणी प्रवृत्ती आम्ही आमच्या छाताडावर नाचवून घेतल्या नसत्या. तुर्तास इतकेच...