Breaking News

वडापाव महागला, डाळी कडाडल्याने खिशाला चाट

मुंबई, दि. 04 - कधीही, कुठेही मुंबईकरांची भूक भागवणारा वडापाव स्वस्त आणि मस्त म्हणून गरीब-श्रीमंतांमध्ये प्रसिद्ध आहे. मात्र आता या ‘बजेट फूड’लाही महागाईचा फटका बसला असून वडापावचे दर पाच ते सात रुपयांनी वाढल्याची माहिती आहे.
मुंबईतल्या नामांकित खाद्यविक्रेत्यांच्या साखळी उपहारगृहांमध्ये वडापावचे दर 5 ते 7 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. तर गाडीवर मिळणार्‍या वडापावचे दरही 2 ते 3 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. डाळींचे भाव कडाडल्यामुळे वडापावच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
12 ते 15 रुपयांच्या दरम्यान मिळणारा वडापाव काही ठिकाणी चक्क 20 रुपयांवर पोहोचला आहे. चणाडाळीच्या दरात झालेल्या वाढीमुळे बेसन महागले आहे.  पर्यायाने या दरवाढीचा परिणाम वडापावच्या किमतीवरही झाल्याचे दिसून येत आहे. बेसनाचे दर दुपटीने वाढल्यामुळे फराळापाठोपाठ वडापावही महाग झाला आहे.