Breaking News

सिंधूचे लक्ष्य’ आता फ्रेंच ओपन

पॅरिस, दि. 25 - ऑलिंपिक रौप्यपदकानंतर कोर्टवरील पुनरागमन डेन्मार्कमध्ये अपयशी ठरले असले, तरी आता भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने या आठवड्यात होणार्‍या फेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे उद्दिष्ट ठेवले आहे. 
डेन्मार्कमध्ये सहाव्या मानांकित सिंधूला दुसर्‍या फेरीत जपानच्या सायाका साटो हिच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. फ्रेंच स्पर्धेत ती हाँगकाँगच्या यिप पुई यिन हिच्याविरुद्ध आपली मोहीम सुरू करेल. त्यानंतर दुसर्‍या फेरीत तिची गाठ पुन्हा एकदा चीनच्या बिंगजिआओ हिच्याशी पडेल. बिंगजिआओ हिच्यावर डेन्मार्कमध्ये पहिल्या फेरीत सिंधूने विजय मिळविला होता.
पुरुष विभागात डच ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा अजय जयरामला पहिल्या फेरीत सोपे आव्हान असेल. त्याची लढत पात्रता फेरीतून आलेल्या खेळाडूशी होईल. स्विस ओपन विजेता एच. एस. प्रणॉय पहिल्या फेरीत बून्साक पोन्साना याच्याशी खेळेल. कॅनडात विजेतेपद मिळविणारा भारताचा बी. साई प्रणित कोरियाच्या ली ह्यून याच्याशी खेळणार आहे.
पुरुष एकेरीत समीर वर्मा हा पात्रता फेरीत खेळणार असून, त्याच्यासमोर ब्राझीलच्या इगॉर कोएल्हो डी ऑलिव्हिएरा याचे आव्हान असेल. दरम्यान, मनू अत्री आणि बी. सुमीत रेड्डी यांनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे.