Breaking News

’मनोधैर्य’तील लाभार्थींना 15 दिवसात अर्थसहाय्य द्याः पंकजा मुंडे

मुंबई, दि. 17 -  राज्यातील बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अ‍ॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिला आणि बालकांना मनोधैर्य योजनेअंतर्गत अर्थसहाय्य दिले जाते. यातील जिल्हा क्षती सहाय्य मंडळाने मंजूर केलेल्या प्रकरणांचा लाभ पीडितांना 15 दिवसांत देण्याचे निर्देश महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत.
मनोधैर्य अंतर्गत मंजूर प्रकरणातील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे अनेक प्रकरणं प्रलंबित होती. अर्थमंत्र्यांनी सर्व प्रकरणांसाठी निधी मंजूर केला आहे. यासंबंधी जिल्हाधिकार्‍यांना जिल्ह्यातील मनोधैर्य योजनेच्या उर्वरित प्रकरणांत तात्काळ निर्णय घेऊन माहिती पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पंकजा मुंडेंनी दिली. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्रॉमा टीम कार्यरत व्हावी अशी सूचना केली. त्यावर पंकजा मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
मनोधैर्य योजनेत बलात्कार आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी किमान 2 लाख आणि विशेष प्रकरणांत जास्तीत जास्त 3 लाख रूपये अर्थसहाय्य देण्यात येतं. अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या पीडितांना त्यांचा चेहरा विद्रुप झाल्यास अथवा कायमचे अपंगत्व आल्यास 3 लाख रूपये देण्यात येतात.
अ‍ॅसिड हल्ल्यात इतर जखमी झालेल्या महिला आणि बालकांस 50 हजार रूपये अर्थसहाय्य देण्यात येतं. पीडीत महिला आणि बालकांना किंवा त्यांच्या वारसदारांना गरजेनुसार निवारा, समुपदेशन, वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य, व्यवसाय प्रशिक्षण यांसारख्या आधार सेवा पुरवून त्यांचे पुनर्वसन करण्यात येते.